पिंपरी : इंग्रज अधिकारी रँडचा वध करणाऱ्या क्रांतीवीर चापेकर बंधूंचा इतिहास पुन्हा उलगडणार आहे. चिंचवडगावातील चापेकर वाड्यातील क्रांतितीर्थ स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये चापेकर बंधूंच्या जीवनावर आधारित १८ प्रसंग आहेत. सिलिकॉन पुतळ्यांच्या माध्यमातून हे प्रसंग साकारले आहेत. या प्रसंगांची ध्वनिफितीद्वारे माहिती दिली जाणार आहे. या स्मारकाच्या माध्यमातून चापेकर बंधूंचा इतिहास तरुण पिढीला जाणून घेता येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहयोगाने आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने उभारलेल्या क्रांतिवीर चापेकर बंधू जीवन प्रसंग दृक्-श्राव्य संग्रहालयाचे लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) होणार आहे.
दामोदर हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर आणि वासुदेव हरी चापेकर यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. चापेकर बंधू यांच्या बलिदानाची आठवण आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या जीवनातील १८ प्रसंग माहिती आणि डिजिटल स्वरूपात चापेकर वाड्यात उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये रँडचा वध करण्याच्या प्रसंगासह तुळशी वृंदावन असणारा चौक, देवघर, स्वयंपाकघर, धान्य कोठार असे प्रसंग साकारले आहेत.
तीन मजली स्मारकाच्या पहिल्या टप्प्यात विविध ऐतिहासिक घटना मांडण्यात आल्या आहेत. पहिल्या मजल्यावर चापेकर बंधूंच्या वाड्याची गोष्ट, भगिनी निवेदिता यांनी या वाड्यास दिलेली भेट, चापेकरांचे मुद्रणालय, रँडच्या वधानंतर चापेकर बंधूंना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली होती. येरवडा कारागृहातील एक प्रसंगही या ठिकाणी उभारण्यात आला आहे. त्याची माहितीही ध्वनिफितीतून देण्यात येणार आहे. दुसऱ्या मजल्यावर रँडचा वध केल्याचा प्रसंग साकारण्यात आला आहे. क्रांतितीर्थ या राष्ट्रीय संग्रहालयात १५०० हून अधिक क्रांतिकारकांची सचित्र माहिती, इतिहास पहिल्यांदाच एकत्रित अभ्यासता येणार असल्याचे समितीचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे यांनी सांगितले.
स्मारक एक मेपासून खुले
क्रांतितीर्थ चापेकर स्मारक नागरिकांसाठी एक मेपासून खुले करण्यात येणार आहे. एका वेळी बारा जणांच्या समूहाला स्मारकात सोडण्यात येईल. प्रत्येकाला ध्वनिफीत ऐकण्यासाठी हेडफोन दिले जाणार आहेत. त्यामुळे क्रांतिवीर चापेकरांचा इतिहास अनुभवता येणार असल्याचे स्मारक समितीचे कोषाध्यक्ष रवी नामदे यांनी सांगितले.
क्रांतितीर्थ स्मारक ७० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आले आहे. दृक्-श्राव्य स्वरूपातील डिजिटल माहितीसह क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या जीवनातील १८ प्रसंगाचे पुतळे सिलिकॉनमध्ये उभारले आहेत. या पुतळ्याद्वारे क्रांतिवीर चापेकर बंधूंचे जीवन अनुभवता येणार आहे. हे संग्रहालय पाहिल्यानंतर तरुण पिढीला प्रेरणा मिळेल. – गिरीश प्रभुणे, अध्यक्ष, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती