छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीयत्व हा स्थायीभाव झाला पाहिजे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे प्रतिपादन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे प्रतिपादन

पुणे : इतिहासासह आपण जगत असतो. त्यामुळे इतिहास कधीच जुना नसतो, तर नेहमीच ताजा असतो. छत्रपती शिवरायांनी प्रथम राष्ट्रीय विचार मांडला. आज देशाला राष्ट्रीय विचारांची नितांत गरज आहे. छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीयत्व हा स्थायीभाव झाला पाहिजे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात बाबासाहेब पुरंदरे बोलत होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस डॉ. सुजित तांबडे या वेळी उपस्थित होते.

पुरंदरे म्हणाले, ‘आजवर छत्रपती शिवरायांच्या कार्यासंदर्भात जे जे लिखाण झाले आहे त्या सर्व लिखाणाचा वापर वर्तमानकाळात व्हायला हवा. छत्रपती शिवरायांसंदर्भात वेगवेगळ्या पातळीवर संशोधन होत आहे. संशोधनासाठी अभ्यास महत्त्वाचा असतो, याचे भान नवलेखकांनी बाळगले पाहिजे. परदेशातील स्मारके  आणि वस्तू संग्रहालये बघून माणूस थक्क होतो. त्याचधर्तीवर शिवसृष्टीतून नव्या पिढीला छत्रपती कळले पाहिजेत, या उद्देशाने शिवसृष्टी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आपल्याकडे डोंगरी, किनारी, सागरी, भुईकोट असे ३५२ किल्ले आहेत. त्यातील २९२ किल्ले मी पाहिले आहेत. आज किल्ल्यांची अवस्था बिकट आहे. मात्र, संवर्धनासाठी जे करता येईल, ते के ले पाहिजे.’

माझी आई संस्कारांची शिदोरी

शिवकार्यासाठी मला आणखी काही वर्षे आयुष्य हवे आहे. मात्र, म्हातारपण आणि आजारपणामुळे हे कार्य आणखी किती पुढे नेता येईल, हे सांगता येणार नाही. माझे जीवन मी सर्वसामान्यांसारखेच जगलो. माझे आई-वडीलही सामान्य होते. माझ्या वागण्याकडे वडिलांचे लक्ष होते. आईने कधी मारल्याचे आठवत नाही. माझी आई म्हणजे संस्कारांची शिदोरी होती. त्यामुळे माझे आई-वडील आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी कधीच विसरू शकणार नाही, अशी भावना बाबासाहेबांनी या वेळी व्यक्त के ली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: History of chhatrapati shivaji shivshahir babasaheb purandare zws

Next Story
उसने पैसे वेळेत न दिल्यामुळे अंगावर अ‍ॅसिड टाकले