पुणे : ‘भिडे वाड्यामध्ये महात्मा फुले यांनी सुरू केलेली मुलींची पहिली शाळा, मानाच्या पाचपैकी तीन गणपती आणि एकेकाळी असलेली बाजारपेठ यामुळे बुधवार पेठ हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि व्यापाराचे मुख्य केंद्र होते. वेश्याव्यवसाय हा येथील एक अपरिहार्य भाग असला तरी समृद्ध इतिहास असलेल्या बुधवार पेठेकडे त्याच एका ठरावीक चष्म्यातून पाहणे चुकीचे आहे,’ असे मत युवा इतिहास संशोधक सुप्रसाद पुराणिक यांनी व्यक्त केले.

मार्वेन टेक्नॉलॉजीजच्या वतीने अविनाश सोवनीलिखित ‘पुणे शहराचा इतिहास’ आणि सुप्रसाद पुराणिकलिखित ‘पुण्याची समृद्ध बुधवार पेठ’ या पुस्तकांचे प्रकाशन खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी लेखकाचे मनोगत व्यक्त करताना पुराणिक बोलत होते. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, चिटणीस पांडुरंग बालकवडे आणि प्रकाशक मनोज केळकर या वेळी उपस्थित होते.

सोवनी म्हणाले, ‘१८११ मध्ये पुण्यात ८६ मारुती होते. पूर्वीच्या पुण्यामध्ये एका भागाची सीमा संपली की एक मारुती असायचा. पासोड्या मारुती हा बुधवार आणि रविवार पेठेची सीमा होता. इतिहासाविषयी विपर्यस्त माहिती देणाऱ्यांचे सध्या समाजमाध्यमांवर पेव फुटले आहे. त्यामुळे इतिहास अभ्यासाचे काम बाजूला ठेवून लोकांमध्ये परवल्या जाणाऱ्या गैरसमजांचे खंडन करण्याचे काम करावे लागते.’

रावत म्हणाले, ‘पुणे शहराला दीड हजार वर्षांचा इतिहास आहे. हिंदूंच्या विजयाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे केंद्र असलेल्या पुणे शहराने हिंदुस्थाच्या इतिहासात प्रबोधन क्षेत्रात महत्त्वाचे याेगदान दिले.’

गुरुप्रसाद कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले. मनोज केळकर यांनी आभार मानले.

पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी मी केली होती. त्यावेळी ‘बुधवार पेठेला मस्तानी यांचे नाव देण्याची’ मागणी करणारे फलक शहरात लागले होते. यामध्ये पेठेची आणि व्यक्तिमत्त्वाची बदनामी करतो याची फलक लावणाऱ्यांना कल्पना नव्हती. सध्या ‘तथाकथित’ इतिहास अभ्यासक आणि संशोधकांचे पेव फुटले आहे. चुकीचा इतिहास चुकीचा लिहिणे हा केवळ गुन्हाच नाही तर ते पाप आहे. असे करण्यामागे दोन करणे असतात. माहिती चुकीची मिळाली तर लेखन चुकीचे होऊ शकते. पण, दिशाभूल करणे हाच एकमेव उद्देश सध्याच्या इतिहास लेखनामागे असल्याचे दिसते. हे गैरसमज अभ्यासू वृत्तीने आपण संपवू शकतो हे या दोन्ही लेखकांच्या पुस्तकातून दिसते. – मेधा कुलकर्णी, खासदार, राज्यसभा