एक डोळा वरच्या बाजूला तर दुसरा डोळा खालच्या बाजूला अशा प्रकारच्या तिरळेपणावर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेनंतर तिरळेपणा पुन्हा उद्भवू नये म्हणून शस्त्रक्रियेत केल्या गेलेल्या एका लहानशा सुधारणेची आंतरराष्ट्रीय नियतकालिकाकडून दखल घेण्यात आली आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयाने ही नवी पद्धत शोधून काढली आहे.
डोळे वर आणि खाली असलेल्या तिरळेपणाच्या रुग्णावर ‘मायोएक्टमी’ नावाची शस्त्रक्रिया केली जाते. मात्र या शस्त्रक्रियेनंतरही ५० टक्के रुग्णांमध्ये तिरळेपणा पुन्हा होऊ शकतो. ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी’ या संस्थेने या शस्त्रक्रियेत सुधारणा केली असून ही नवी पद्धत वापरल्यानंतर या प्रकारचा तिरळेपणा पुन्हा उद्भवण्याची शक्यता २ टक्के असल्याचे निरीक्षण संस्थेने तीन वर्षांत शस्त्रक्रियांवरून नोंदवले आले. यात २ ते ४८ वर्षे या वयोगटातील ५१ रुग्णांवर मायोएक्टमी ही शस्त्रक्रिया केली गेली. हे संशोधन ‘मिडल इस्ट एशियन जर्नल ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. नेत्रतज्ज्ञ डॉ. जाई केळकर, डॉ. आभा कानडे, डॉ. सुप्रिया आगाशे, डॉ. आदित्य केळकर आणि डॉ. राजीव खांडेकर यांचा या संशोधनात सहभाग आहे.
डॉ. जाई म्हणाल्या,‘तिरळेपणावरील ‘मायोएक्टमी’मध्ये डोळ्यात आतल्या बाजूला असलेल्या तिरक्या स्नायूंवर (ऑब्लिक मसल्स) शस्त्रक्रिया करावी लागते. शस्त्रक्रियेत हा स्नायू कापून पुन्हा शिवला जातो किंवा तसाच सुटा सोडून दिला जातो. हा कापलेला स्नायू शिवणे तांत्रिकदृष्टय़ा अवघड आहे. स्नायू तसाच सुटा सोडून दिला तरीही तिरळेपणा पुन्हा उद्भवू शकतो. नवीन पद्धतीत ऑब्लिक स्नायू कापल्यावर तो न शिवता गुंडाळून तिथेच आतमध्ये खोचून ठेवला जातो. यामुळे तिरळेपणा पुन्हा होणे टाळले जाऊ शकते.’
संग्रहित लेख, दिनांक 17th Sep 2015 रोजी प्रकाशित
शस्त्रक्रियेनंतर तिरळेपणा परत न उद्भवण्यासाठी नवीन पद्धत विकसित
पुण्यातील एका खासगी रुग्णालयाने ही नवी पद्धत शोधून काढली आहे
First published on: 17-09-2015 at 03:08 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hospital eye method operation