scorecardresearch

धर्मादाय शब्दाबाबत रुग्णालये सकारात्मक

अनेकदा आर्थिक परिस्थिती नसताना देखील पैशांची तजवीज करून रुग्णालयाचे पैसे भरले जातात.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि सह्य़ाद्री मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाने धर्मादाय आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नावामध्ये धर्मादाय शब्दाचा उल्लेख करण्याविषयी तयारी दर्शवली आहे. पुढील दहा दिवसांमध्ये नावामध्ये बदल करून धर्मादाय शब्दाचा आंतर्भाव करणार असल्याची माहिती रुग्णालयांकडून देण्यात आली आहे.

खासगी रुग्णालयांच्या उपचारांचे दर माहीत नसल्याने सामान्य आणि गरीब आर्थिक स्तरांतील रुग्ण तेथे उपचारांसाठी जाणे टाळतात. अनेकदा आर्थिक परिस्थिती नसताना देखील पैशांची तजवीज करून रुग्णालयाचे पैसे भरले जातात. रुग्णालयाच्या नावात धर्मादाय शब्दाचा उल्लेख असल्यास सर्व आर्थिक गटांतील रुग्ण कोणत्याही दडपणाशिवाय तेथे जाऊन उपचार घेऊ शकतील. या उद्देशाने राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना रुग्णालयाच्या नावामध्ये धर्मादाय शब्दाचा आंतर्भाव करणे बंधनकारक असल्याचा आदेश राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी काढला आहे. पुणे शहरात एकूण छप्पन्न रुग्णालये धर्मादाय प्रकारात मोडणारी असून राज्यात धर्मादाय रुग्णालयांची संख्या ४५० एवढी आहे. राज्यातील रुग्णांनी धर्मादाय शब्दाचा आंतर्भाव करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असताना सांगली, सिंधुदुर्ग आणि भंडारा जिल्ह्य़ातील धर्मादाय रुग्णालयांनी नावात हा बदल केल्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सांगितले.

पुणे शहरातील रुबी हॉल क्लिनिक, सह्य़ाद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, संचेती रुग्णालय, जहांगीर रुग्णालय, दीनानाथ मंगेशकर यांसारखी छप्पन्न रुग्णालये धर्मादाय रुग्णालये आहेत. दरम्यान प्रजासत्ताक भारत पक्षाने गुरुवारी रुग्णालयांनी नावात आणि प्रवेश अर्जावर धर्मादाय शब्दाचा उल्लेख करावा तसेच गरीब आर्थिक परिस्थितीतील रुग्णांना चांगली वागणूक मिळावी यासाठी आंदोलन केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hospitals are positive about charity word to add in name

ताज्या बातम्या