पुणे : नगर रस्त्यावर मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केल्याने हॉटेल व्यावसायिकासह दोघांनी लोणीकंद पोलीस ठाण्यासमोर पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी हॉटेल व्यवासायिकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक सत्यवान हौशीराम गावडे (वय ३४), राम अशोकराव गजमल (वय २२, दोघे रा. उबाळेनगर, वाघोली) यांच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलीस शिपाई अमोल गावडे यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावडे यांचे वाघोली परिसरात न्यू प्यासा हॉटेल आहे. हॉटेल मध्यरात्रीनंतर सुरू असल्याने पोलिसांनी हॉटेल कामगार राम गजमलविरुद्ध खटला दाखल केला. पोलिसांनी हॉटेलवर कारवाई केल्याने हॉटेल व्यावसायिक गावडे, कामगार गजमल लोणीकंद पोलीस ठाण्यात गेले.

हेही वाचा >>> धक्कादायक! पिंपरी- चिंचवडमध्ये तीन वर्षीय चिमुरड्याला खेळता- खेळता विहिरीत ढकलले; अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल

दोघांनी सोमवारी सायंकाळी अंगावर ज्वलनशील द्रवपदार्थ ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांना रोखल्याने अनर्थ टळला. दोघांविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गावडे तपास करत आहेत.

पोलिसांवर आरोप

रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या हॉटेलवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे. परमिट रुम, बार मध्यरात्री दीडपर्यंत सुरु ठेवावेत, असे आदेशात म्हटले आहे. लोणीकंद पोलिसांकडून दरमहा पैसे घेण्यात येत होते. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर रक्कम वाढवून देण्यास सांगण्यात आले. रक्कम वाढवून देण्यास नकार दिल्याने पोलिसांनी त्रास देण्यास सुरुवात केली, असा आरोप हॉटेल व्यावसायिक सत्यवान गावडे यांनी केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्रास देण्यास सुरूवात केली, असे गावडे यांनी प्रसारित केलेल्या ध्वनिचित्रफितीत म्हटले आहे.

हेही वाचा >>> lokSabha Election 2024 : वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यास वंचितच्या पुण्यातील नेत्यांचा विरोध

पोलीस उपायुक्तांकडून चौकशी लोणीकंद पोलीस ठाण्यासमोर हॉटेल व्यावसासिकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्याने पोलिसांवर गंभीर आरोप केले. पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न करत तरुणाने गंभीर आरोपी केल्यानंतर वरिष्ठांनी याची दखल घेतली आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले. मंगळवारी हॉटेल व्यावसायिकासह अन्य काहीजणांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी लोणीकंद पोलीस ठाण्यासमोर एका तरुणाने पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेत गंभीर भाजलेल्या तरुणाचा उपाचरादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.