Pune Pilot Survived after Plane Crash: अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात अद्याप कुणी विसरलेलं नाही. या अपघातात २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अद्यापही या अपघाताचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. यावरून वैमानिकाचं काम किती आव्हानात्मक असतं, याची प्रचिती येते. २०२१ साली पुण्यातील बारामती येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळण्याची घटना घडली होती. सुदैवाने विमानातील वैमानिक २४ वर्षीय तरुणी भाविका राठोड यातून सुखरूप बचावली. वैमानिक म्हणून अधिकृत मान्यता मिळविण्यासाठी केवळ ५० तासांच्या उड्डाणाचं प्रशिक्षण बाकी असताना भाविकाबरोबर अपघात घडला. पण यानंतरही जिद्दीनं तिनं हे प्रशिक्षण पूर्ण केलं.

द इंडियन एक्सप्रेसच्या शुभम कुरळे यांनी भाविकाच्या आयुष्यातील थरारक प्रसंगाचे वार्तांकन केले आहे. भाविकाने पुण्यातील मुक्तांगण इंग्लिश शाळेतून शिक्षण घेतले. लहानपणीच शाळेतील एका व्याख्यानामुळे तिच्या मनात वैमानिक होण्याच्या स्वप्नाचे बीज रोवले गेले.

२०१९ साली १२ वी पूर्ण झाल्यानंतर वैमानिकाचे शिक्षण घेण्यासाठी भाविकाने फ्लाइंग स्कूलची शोधाशोध केली. दरम्यान २०२० साली आलेल्या करोना महामारीमुळे तिला काही काळ थांबावं लागलं. मात्र ऑक्टोबर २०२१ मध्ये तिनं बारामती येथील कार्व्हर एव्हिएशन फ्लइंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला.

व्यावसायिक वैमानिक म्हणून परवाना मिळविण्यासाठी २०० तासांचे उड्डाण पूर्ण करणे आणि सहा विषयांचा सैद्धांतिक अभ्यास पूर्ण करणे गरजेचं असतं. यासाठी अंदाजे दोन वर्षांचा काळ लागतो. भाविकाने सांगितले की, १५० तासांचे उड्डाण पूर्ण झाल्यानंतर एकेदिवशी ती नेहमीप्रमाणे पुन्हा उड्डाण घेण्यासाठी सज्ज झाली होती.

१००० फूट उंचीवर असताना अचानक इंजिन बंद

बारामतीमधील प्रशिक्षण तळावरून सेसना १५२ या विमानातून तिने उड्डाण घेतलं. उड्डाणानंतर फक्त १५ नॉटिकल मैल अंतरावर गेल्यानंतर आणि जमिनीपासून केवळ १००० फूट उंचीवर असताना विमानाच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. ज्या तळावरून उड्डाण घेतले, तिथं परतण्याचा पर्याय उरला नव्हता. अशावेळी भाविका राठोडनं संयम दाखवत घेतलेले प्रशिक्षण प्रत्यक्षात आणले.

इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर इंदापूर येथील कडबनवाडी गावातील पानथळ जमिनीवरील मोकळ्या जागेत विमान उतरविण्याचा निर्णय तिनं घेतला. विमान जमिनीवर कोसळ्यानंतर त्याला अधिक नुकसान होऊ नये, यासाठी हीच युक्ती शिकवल्याचे भाविकानं सांगितलं. इंजिनमधील बिघाडानंतर भाविकानं विमानाचं यशस्वी क्रॅश लँडिंग केलं. विमान कोसळल्यानंतर भाविका अपघातातून सुखरूप बचावली. तिच्या हनुवटीला किरकोळ जखम झाली.

Bhavika managed to safely crash-land the aircraft
इंदापूर येथील गावात विमान कोसळलं. यातून भाविका राठोड थोडक्यात बचावली. (Photo – TIEPL)

भाविकानं पुढे म्हटलं की, माझ्या आयुष्यातील ही धक्कादायक गोष्ट होती. यामुळे मला मोठा धक्का बसला. पण देवाच्या कृपेने मी जिवंत राहिले. या अपघातानंतर नागरी विमान वाहतूक संचालकांनी सदर प्रकरणाची चौकशी केली. तीन दिवसांच्या चौकशीनंतर भाविकाला उड्डाण करण्यापासून काही काळ रोखण्यात आलं. (कुलिंग परियड)

“याकाळात मी पुन्हा उड्डाण करू शकेन का? हा विश्वास गमावला होता. मी हळूहळू नैरश्याला सामोरे जाऊ लागली. दोन महिन्यांनंतर मी वैमानिक होण्याचे स्वप्न सोडून बीबीए करण्याचा विचार केला. मात्र माझ्या कुटुंबाने आणि मित्रांनी मला या काळात धीर दिला. त्यांनी माझ्यातील नकारात्मकता झटकून टाकण्यासाठी मदत केली”, असे भाविकानं सांगितलं.

अपघाताच्या पाच महिन्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये भाविका राठोडला पुन्हा सुधारित प्रशिक्षण घेण्यासाठी ना हरकत (एनओसी) मिळाली. या काळात प्रशिक्षणार्थी वैमानिक जोपर्यंत त्यांना उड्डाणाचा आत्मविश्वास येत नाही, तोपर्यंत प्रशिक्षकांबरोबर उड्डाण करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जानेवारी २०२३ मध्ये, भाविका कार्व्हर एव्हिएशनमध्ये परतली. पुन्हा खडतर प्रशिक्षण घेऊन भाविका राठोडनं सप्टेंबर २०२३ मध्ये अधिकृत वैमानिकाचे प्रमाणपत्र मिळवलं. मागच्याच वर्षी भाविकानं स्पेनमध्ये एअरबस ३२० हे विमान चालविण्याचं ४५ दिवसांचं प्रशिक्षण पूर्ण केलं.