Gautam Gaikwad : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून गेल्या बुधवारी म्हणजेच २० ऑगस्ट रोजी मित्रांसह फिरायला आलेल्या गौतम गायकवाड हा तरुण अचानक बेपत्ता झाला होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांकडून त्या बेपत्ता तरुणाचा सातत्याने शोध घेतला जात होता. अखेर किल्ल्यावरून गायब झालेला तो तरुण सापडला आहे. गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असेल्या गौतम गायकवाडचा शोध लागला असून पुणे पोलिसांनी CCTV मार्फत त्याला शोधलं आहे.
गौतम गायकवाड सिंहगडाच्या ‘तानाजी कडा’ परिसरात पोहचल्यावर काय घडलं?
स्वतःला कॅमेरापासून वाचवत, लपत छपत हुडी घालून गौतम गायकवाड हा तरुण चालला होता. त्याच्याच मित्रांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला दोघांचे फोन आले. एकाने सांगितलं माझे दहा लाख रुपये त्याने घेतले. दुसऱ्याने सांगितलं माझे आठ लाख रुपये होते. आम्ही हा पैलूही तपासतो आहे असंही पोलिसांनी सांगितलं.
गौतम गायकवाड हा तरुण मूळचा फलटणचा आहे
गौतम गायकवाड हा तरुण साताऱ्यातील फलटणचा आहे. सध्या तो हैदराबादमध्ये वास्तव्य करतो आणि तिथे एक कॅफे चालवतो. २० ऑगस्टला गौतम आणि त्याचे मित्र सिंहगडावर फिरायला आले होते. सिंहगडावरील तानाजी कडा या ठिकाणी आल्यानंतर गौतम म्हणाला की त्याला लघुशंकेला जायचं आहे. त्यानंतर तो गेला तो परतलाच नाही. त्याच्या मित्रांनी त्याला बरंच शोधलं, हाकाही मारल्या पण त्याचा प्रतिसाद आला नाही किंवा तो सापडला नाही. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार देण्यात आली होती. गौतम गायकवाड याचे काही आर्थिक व्यवहार होते अशीही माहिती समजते आहे. पुणे ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गिर्यारोहकांनीही गौतमचा शोध सुरु केला पण सिंहगड भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्याने मागचे चार दिवस त्याचा शोध लागला नाही. सिंहगडावरुन तो बेपत्ता झाल्याचं त्याच्या कुटुंबालाही कळवण्यात आलं होतं. तसंच हवेली पोलीस ठाण्यात गौतम हरवल्याची तक्रारही नोंदवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. जेव्हा त्यांना सिंहगडाच्या पायथ्याशी गौतम गायकवाड आहे हे आढळून आलं. गौतम गायकवाड कॅमेरापासून लपत होता तेव्हाच तो कॅमेरात कैद झाला असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी काय सांगितलं?
हैदराबादला राहणारा आणि मूळचा फलटणचा असणारा गौतम गायकवाड हा तरुण २० ऑगस्टला सिंहगडावर फिरायला आला होता. त्यावेळी तो तानाजी कडा भागातून गायब झाला. हवेली पोलिसांनी त्याचा शोध २० तारखेला घेतला होता. आम्हाला त्याची फक्त चप्पल सापडली. दरम्यान पुढच्या चार दिवसांमध्ये आम्ही त्याच्या नातेवाईकांकडे आणि मित्रांकडे चौकशी केली. पण आम्हाला ठोस अशी माहिती समोर आली नाही. मात्र रविवारी पाच ते सहाच्या सुमारास गडावरच तो ओरडत होता अशी माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी पोहचली. त्याची प्रकृती बरी नाही. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ज्या दिवशी तो गायब झाला होता तेव्हाही एक माणूस हुडी घालून जातो आहे असं फुटेज समोर आलं होतं. पण आता आम्ही या प्रकरणी शोध घेत आहोत. मित्रांचं आणि त्याचे आर्थिक व्यवहार आहेत असं कळतं आहे. गौतम गायकवाड हा फळांचा व्यवसाय करतो. फळं एक्सपोर्ट इंपोर्टच्या व्यवसायात तो आहे. असं संदीप सिंग गिल यांनी सांगितलं. एबीपी माझाशी साधलेल्या संवादात ही माहिती त्यांनी दिली.