पुणे : ‘व्यक्तिचित्रणात्मक लेखनातून ती व्यक्ती परिपूर्ण स्वरूपात उलगडणे महत्त्वाचे असते. ‘हृद्य’ पुस्तकातील व्यक्तिचित्रणे ही भक्त किंवा अंधभक्ताच्या नजरेतून नाही तर समीक्षात्मक भूमिकेतून आहे. त्यामध्ये सद्गुणांच्या वर्णनाबरोबर संबंधित व्यक्तिमत्त्वाच्या मर्यादांचा आणि उणिवांचा निर्देश त्या व्यक्तीच्या मोठेपणाचा आब राखून करून दिली आहे. त्या अर्थाने ‘हृद्य’मधील व्यक्तिचित्रणे परिपूर्ण स्वरूपाची आहेत,’ असे मत ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डाॅ. शिरीष प्रयाग यांनी शनिवारी व्यक्त केले.
रोहन प्रकाशनच्या वतीने ज्येष्ठ लेखिका रेखा इनामदार-साने यांनी लिहिलेल्या ‘हृद्य’ या पुस्तकाचे प्रकाशन डाॅ. शिरीष प्रयाग यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, प्रकाशक प्रदीप चंपानेरकर आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे राजेश देशमुख या वेळी उपस्थित होते. डाॅ. प्रयाग म्हणाले, ‘साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानच्या वतीने निर्मिती करण्यात आलेल्या ‘अजून तेंडुलकर’ पुस्तकाच्या निमित्ताने माझी रेखा यांच्याशी ओळख झाली. पारदर्शक स्वभाव आणि समीक्षकाची नजर हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे.’
केतकर म्हणाले, ‘माणसांना जवळून ओळखायचे म्हणजे काय असते याचा हे लेखन म्हणजे आदर्श वस्तुपाठ आहे. हे पुस्तक मानसोपचार विषयाच्या विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. यामधील काही व्यक्तिमत्त्वांच्या वैचारिक जडणघडणीमध्ये विविध विचारधारांचा संगम दिसून येतो. विचारधारा ही केवळ राजकीय स्वरूपाची नाही. तर ही गुंतागुंतीची संकल्पना रेखा इनामदार यांनी त्यांच्या लेखनातून प्रभावीपणे उलगडली आहे. या पुस्तकामध्ये परिचय करून देण्यात आलेली व्यक्तिमत्त्वे प्रसिद्ध असली तरी रूढार्थाने लोकप्रिय नाहीत. आता तसा अभिजन वर्ग महाराष्ट्रात अस्तित्वात नाही. अन्यथा हा सामाजिकशास्त्राच्या अभ्यासाचा विषय झाला असता. त्याची मांडणीही या लेखनातून उत्तमपणे केली आहे. चंपानेरकर यांनी प्रास्ताविक केले. देशमुख यांनी आभार मानले. पं. कुमार गंधर्व यांच्या मैफलीची दृष्यफीत दाखवून कार्यक्रमाचा समारोप झाला.
फार मोठी माणसे मला लहान वयात भेटली आणि त्यातून आपण किती लहान आहोत याची जाणीव झाली. सुख उपभोगायची किंवा दुःख कुरवळायची उसंत मला आयुष्याने दिली नाही. हे जग जगण्याच्या लायकीचे आहे आणि माणसे सत्प्रवृत्त असतात यावर माझा विश्वास वाढीला लागला. आपल्याकडे अपंग मुलाचे एकल पालकत्व निभावण्याची एक प्रकारची आचारसंहिता आहे. तिचे पालन करून अध्यापन, संशोधन आणि प्रशासकीय गोष्टी सांभाळून साहित्य वर्तुळामध्ये ठिपक्यातकी जागा मिळवू शकले याचे समाधान आहे. – रेखा इनामदार-साने, प्रसिद्ध लेखिका