वाणिज्य शाखेच्या विषयाची प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांवर ; राज्य मंडळाची मात्र डोळेझाक
बारावीच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटण्याचे सत्र सलग पाचव्या दिवशीही सुरूच असून वाणिज्य शाखेच्या चिटणिसाची कार्यपद्धती (सेक्रेटरिअल प्रॅक्टिस) या विषयाची प्रश्नपत्रिका शनिवारी वेळेपूर्वी जवळपास पंधरा मिनिटे व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाली होती. भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिकाही वेळेपूर्वीच व्हॉट्स अॅपवर उपलब्ध झाली असल्याची चर्चा आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या रोजच्या चर्चेकडे राज्य मंडळाकडून मात्र डोळेझाक करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
यंदा २८ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झाली. पहिल्याच दिवसापासून प्रश्नपत्रिका फुटण्याची चर्चा सुरू आहे. सलग पाचव्या दिवशीही परीक्षा सुरू होण्यापूर्वी जवळपास वीस मिनिटे प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र व्हॉट्स अॅपवरून व्हायरल झाल्याचे समोर येत आहे. परीक्षेच्या सकाळच्या सत्रात वाणिज्य शाखेच्या चिटणिसाची कार्यपद्धती (सेक्रेटरिअल प्रॅक्टिस) या विषयाची परीक्षा होती. सकाळी ११ वाजता परीक्षा सुरू होणार होती. गेली दोन वर्षे परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे आधी विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका दिल्या जातात. त्यानुसार १० वाजून ५० मिनिटांनी विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका देणे अपेक्षित होते.
मात्र मुंबई विभागात साधारण १० वाजून ४५ मिनिटांनीच प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्याचे समोर आले. व्हॉट्स अॅपवरील प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र आणि मूळ प्रश्नपत्रिका तंतोतंत जुळत असल्याचे लक्षात आल्यावर विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. सकाळच्या सत्रातील विज्ञान शाखेच्या भौतिकशास्त्र विषयाची आणि दुपारच्या सत्रातील कला शाखेची राज्यशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिकाही व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्याची चर्चा आहे.
राज्य मंडळाची भूमिका संभ्रमाची
परीक्षा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी इंग्रजी, हिंदी या विषयांच्या प्रश्नपत्रिकाही व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून पसरल्या होत्या. मुंबई येथे गुरुवारी मराठी विषयाची प्रश्नपत्रिकाही फुटली होती. सलग पाच दिवस परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका सगळीकडे व्हायरल होत असल्याचे समोर आले असतानाही राज्य मंडळाने मात्र थंड भूमिका घेतल्याचे दिसत आहे. विद्यार्थी साडेदहा वाजताच परीक्षा खोलीत येतात. त्यानंतर प्रश्नपत्रिका बाहेर गेल्या आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटल्याचे म्हणता येणार नाही अशी भूमिका मंडळाने घेतली आहे.
व्यावसयिक अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेत एका गुणाचा प्रश्न कमी
व्यावसायिक अभ्यासक्रमाची ‘सर्वसाधारण पायाभूत अभ्यासक्रम भाग २’ (जनरल फाउंडेशन कोर्स) या विषयाची परीक्षा शनिवारी होती. यामध्ये गाळलेल्या जागा भरा हा पहिला प्रश्न चार गुणांचा असून त्यात चार उपप्रश्न असणे अपेक्षित होते. मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत हे चारही उपप्रश्न आहेत. मात्र इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत तीनच उपप्रश्न देण्यात आले आहेत. कमी असलेल्या एका प्रश्नाचे गुण मिळणार का असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. ‘याबाबत परीक्षा नियंत्रकांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.
त्यांच्या अहवालानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल,’ असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.
वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकाराबाबत वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक चेतन काकडे सायबर गुन्हे विभागाच्या मदतीने या प्रकाराचा तपास करत आहेत. ज्या व्हॉट्स अॅप समूहावरून ही प्रश्नपत्रिका पहिल्यांदा पुढे पाठवण्यात आली तो समूह शोधण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
लातुरमध्येही ‘पेपरफुटी’
लातूर : जिल्हय़ातील देवणी तालुक्यात धनेगाव येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू झाल्यानंतर दहा मिनिटांतच प्रश्नपत्रिका व्हायरल झाली. त्यानंतर कॉपी पुरवण्यासाठी पालकांची एकच गर्दी झाली. बठे पथक तेथे असतानाही हा प्रकार घडला. तीन दिवसांपूर्वी निलंगा तालुक्यातील शिवणी कोतल परीक्षा केंद्रावर असाच प्रकार घडला होता. १२वीच्या परीक्षाच्या पदार्थ विज्ञानाची प्रश्नपत्रिका बाहेर आल्याने परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.