पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड टक्क्याने घटला. कॉपीमुक्त परीक्षा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीचा निकालावर परिणाम दिसत आहे. कोकण विभागाचा निकाल सलग १४ व्या वर्षी सर्वाधिक असून ‘लातूर पॅटर्न’ मात्र नापास झाल्याचे चित्र सोमवारच्या निकालातून दिसले.
राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १२वीच्या परीक्षाचा निकाल यंदा ९१.८८ टक्के लागला आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ या वेळी उपस्थित होते. गेल्या वर्षी ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. राज्यातील ८ हजार ३५२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. ‘परीक्षेच्या काळात कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी राज्यभरात करण्यात आली. त्यात विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच राज्यभरातील ३ हजार ३७३ केंद्रांपैकी ८१८ केंद्रांवर केंद्र संचालक, पर्यवेक्षक, परीक्षेशी संबंधित व्यक्ती बदलण्यात आल्या होत्या,’ असे गोसावी यांनी सांगितले.
मंडळाच्या उपाययोजनांमुळे कॉपीचे प्रमाण कमी झाले व त्याचा परिणाम निकालावर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, कला शाखेचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी घटला आहे. गेल्या चार वर्षांत मिळून कला शाखेचा निकाल १० टक्क्यांनी कमी झाला आहे. विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण फारसे बदललेले नाही. त्याशिवाय यंदा व्यवसाय अभ्यासक्रम आणि ‘आयटीआय’चा निकालही गेल्या वर्षीच्या तुलनेत घटल्याचे दिसून येते. यंदा व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल ८३.२६ टक्के, तर आयटीआयचा निकाल ८२.०३ टक्के लागला असून, गेल्या वर्षी तो अनुक्रमे ९७.७५ टक्के आणि ८७.३७ टक्के होता.
कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर
कोकण – ९६.७४
कोल्हापूर – ९३.६४
मुंबई – ९२.९३
नाशिक – ९१.३१
नागपूर – ९०.५२
लातूर – ८९.४६
छत्रपती संभाजीनगर – ९२.२४
अमरावती – ९१.४३
पुणे – ९१.३२