सुसाईड बॉम्बर असल्याच्या बातमीने माझी नाहक बदनामी झाली, त्या संपूर्ण प्रकरणात माझी काहीही चूक नाही असे स्पष्टीकरण सादिया शेखने दिले. असे असले तरीही काही काळ मी आयसिसच्या प्रभावाखाली गेले होते पण मौलवींच्या समुपदेशनानंतर मी त्या प्रभावातून बाहेर आले असे स्पष्टीकरण सादिया शेखने पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.
जम्मू काश्मीरमध्ये २६ जानेवारी रोजी घातपात करणार म्हणून माझे नाव पुढे करण्यात आले. मात्र पोलीस तपासात मी निर्दोष आढळले. मला पोलिसांनी पकडले नाही तर मी स्वतःहून पोलिसांकडे गेले असे स्पष्टीकरण सादिया शेखने पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिले. मी जम्मू काश्मीरमध्ये शिक्षणासाठी गेले होते, मात्र त्यावेळी मी सुसाईड बॉम्बर आहे अशा चर्चा सुरू झाल्या. ज्या ऐकून मला धक्का बसला. त्यानंतर मी स्वतः पोलिसांकडे गेले.तपासातून काही निष्पन्न झाले नसून मी निर्दोष असल्याचे तिने सांगितले. तर आता पुढे शिक्षणासाठी पुन्हा जम्मू काश्मीर येथे जाणार असल्याचे सादियाने सांगितले.
जम्मू काश्मीर येथे २६ जानेवारी रोजी सादिया शेख नावाची तरूणी घातपात घडवणार असल्याची शक्यता केंद्रीय गुप्तचर विभागाने वर्तवली होती. या तरूणीचा शोध लवकर लागावा म्हणून पुणे पोलिसांशीही संपर्क करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सादियाला ताब्यात घेतले तिची चौकशी केली पण पुरावे न आढळल्याने ती निर्दोष असल्याचे जाहीर करण्यात आले. या सगळ्या घडामोडीनंतर सादिया पुण्यात आली. पुण्यात आल्यावर सादियाने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. सादियावर सुसाईड बॉम्बर असल्याचा आरोप करण्यात आला त्यावेळी आम्हाला आमचे आयुष्यच संपल्यासारखे वाटले अशी प्रतिक्रिया तिच्या आईने दिली आहे.