पुणे : ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याला पूरक चित्रे मी रेखाटू शकलो, हा माझा भाग्ययोग आहे. एका अर्थाने ‘पुलं’च्या शब्द प्रवासाचा मी निःशब्द सहप्रवासी आहे,’ अशी नम्र भावना ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी मंगळवारी व्यक्त केली.
‘ग्लोबल पुलोत्सवा’मध्ये महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी पुलं आणि त्यांच्या साहित्यास समर्पित केलेल्या व्यंगचित्रांच्या आणि चिंतामणी हसबनीस यांच्या ब्रेल चित्रांच्या खास प्रदर्शनाचे उद्घाटन शि. द. फडणीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, संयोजक वीरेंद्र चित्राव, ‘कार्टूनिस्ट कंबाइन’चे अध्यक्ष संजय मिस्त्री, प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुहास पंडित या वेळी उपस्थित होते. सागर पवार यांनी काढलेल्या अर्कचित्राचे अनावरण फडणीस यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमान्य सिल्व्हर विंडो क्लब प्रस्तुत सुधीर मोघे दिग्दर्शित ‘या सम हा’ हा पुलंवरील लघुपट दाखविण्यात आला.
फडणीस म्हणाले, ‘पुलं हे केवळ विनोदी लेखन करणारे नव्हते. तर, त्यांना सामाजिक प्रश्नांचीदेखील जाणीव आणि भान होते. सामाजिक भानाच्या अनुषंगाने त्यांचे स्वगत हे त्यांच्या विनोदी साहित्याला मिळालेल्या हशा आणि टाळ्यांच्या आवाजात ऐकू गेले, की नाही, अशी शंका येते. पुलंच्या व्यक्तिमत्त्वामध्ये रवींद्रनाथ टागोर यांचे तत्त्वज्ञान आणि चार्ली चॅप्लीनची खेळकर वृत्ती याचा संयोग दिसून येतो. ब्रेल लिपीच्या माध्यमातून चिंतामणी हसबनीस यांनी दुसऱ्या जगातील व्यक्तींपर्यंत चित्रे पोहोचविण्याचा केलेला प्रयत्न अतिशय अवघड पण तितकाच स्तुत्य आहे.’