पुणे : हॉटेलमध्ये कुटुंबासह जेवण करण्यासाठी गेलेल्या एका महिलेला दिलेल्या सूपमध्ये झुरळ सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. वानवडी भागातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांकडून संबंधित हॉटेलचे मालक, तसेच व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अश्विनी रवी शिससाट (वय ३१, रा. दापोडी, मुंबई-पुणे रस्ता) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भिवंडी दरबार हॉटेलचे व्यवस्थापक अमन हुसेन शेख (वय २४, रा. आझादनगर, भिवंडी) याच्यासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरसाट कुटुंबीय हे गेल्या महिन्यात १६ जून रोजी वानवडीतील भिवंडी दरबार हाॅटेलमध्ये रात्री जेवण करण्यासाठी गेले होते. त्यंनी जेवण मागविले. जेवण सुरू करण्यापूर्वी त्यांना सूप देण्यात आले. तेव्हा शिरसाट यांना दिलेल्या सूपमध्ये झुरळ आढळले. या घटनेनंतर शिरसाट यांनी हाॅटेल व्यवस्थापकासह कामगारांना जाब विचारला. तेव्हा त्यांनी सारवासारव केली.

हॉटेल व्यवस्थापकाने भटारखान्यातील स्वच्छतेची कोणतीही दक्षता घेतली नाही, तसेच ग्राहकांच्या आरोग्याला हानी होईल, असे खाद्यपदार्थ दिल्याचे शिसराट यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २७५ अन्वये (ग्राहकांना भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री करणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार कुंभार तपास करत आहेत. यापूर्वी विश्रांतवाडी भागातील एका कॅफेमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत एका तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार तरुणाने संबंधित कॅफेमधून मैत्रिणीसाठी चॉकलेट शेक मागविले होते. शेकमध्ये मृतावस्थेत उंदीर सापडला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भटारखान्यात स्वच्छतेबाबत अन्न आणि ओैषध प्रशासनाने (एफडीए) हॉटेल व्यवस्थापानाला सूचना दिल्या आहे. हॉटेलमधील भटारखान्यांची स्वच्छता, तसेच खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्यात येऊ नयेत, असे एफडीएने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. शहरात गल्लाोगल्ली खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या लावण्यात येतात. या गाड्यांवर पुरेशी स्वच्छता घेतली जात नही, तसेच दुषित पाण्याचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे.