लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: परदेशी विद्यापीठे भारतात आल्याने कमी दर्जाच्या विद्यापीठांना काही प्रमाणात फटका बसू शकतो. मात्र भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेसारख्या (आयसर पुणे) संस्थेवर परदेशी विद्यापीठांचा नकारात्मक परिणाम होणार नाही. त्यामुळे परदेशी विद्यापीठांशी स्पर्धा करण्यास आयसर पुणे सक्षम आहे, अशी भावना नवनियुक्त संचालक डॉ. सुनील भागवत यांनी मांडली.

डॉ. भागवत यांची आयसर पुणेच्या संचालकपदी काही दिवसांपूर्वी नियुक्ती झाली. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर संचालक म्हणून असलेली जबाबदारी, भविष्यातील योजना, संशोधन या अनुषंगाने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. माजी संचालक डॉ. जयंत उदगावकर, कुलसचिव कर्नल (नि.) राजा शेखर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू आदी या वेळी उपस्थित होते.

आणखी वाचा- करोनाचा विदा प्रचंड, विश्लेषण आव्हानात्मक

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये असलेल्या तरतुदींपैकी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम, आंतरविद्याशाखीय शिक्षण अशा व्यवस्था आयसर पुणेमध्ये आधीपासूनच अस्तित्वात आहेत. आयसर पुणेमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान, मानव्यता शाखांतील अद्ययावत ज्ञान देण्याबरोबर भविष्यासाठी तयार केले जाते. संशोधनासाठी उत्तम सोयीसुविधा संस्थेत आहेत. मूलभूत विज्ञानापासून विदा विज्ञानापर्यंत विविध प्रकारचे संशोधन करण्यात येते. प्रा. के. एन. गणेश. डॉ. जयंत उदगावकर यांनी आयसर पुणेच्या जडणघडणीत महत्त्वाचे काम केले आहे. आता ते अधिक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. येत्या काळात मानव्यता शाखेतील काही नवे अभ्यासक्रम, विज्ञानातील काही नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. संशोधनाला चालना देण्यात येईल. विज्ञान संस्थांमध्ये केवळ देशात नाही, तर जगभरातील संस्थांमध्ये आयसर पुणेने आघाडी घ्यावी, यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयसर पुणेमध्ये गेल्या काही काळात शुल्कवाढीविरोधात विद्यार्थ्यांची आंदोलने झाली होती. या पार्श्वभूमीवर शुल्कवाढीबाबत डॉ. भागवत म्हणाले, की परदेशातील संस्थांमध्येही शुल्कवाढ केली जाते. शुल्कातून विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा उपलब्ध केल्या जातात. त्यामुळे आवश्यकतेनुसार शुल्कवाढ करण्यात येईल.