पुणे : पाऊस पडून गेल्यानंतर मातीच्या स्मृतीचे (ओलाव्याचे) प्रमाण मोजण्यासाठी शास्त्रज्ञांनी नवी पद्धत विकसित केली आहे. या सूत्राचा वापर करून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, मातीचा स्मरणकाळ महिनाभरापेक्षा थोडा अधिक असून, मातीतील ओलावा जमिनीजवळच्या वातावरणाला प्रभावित करू शकतो, असे दिसून आले. या शोधामुळे जमिनीवरील प्रक्रिया वातावरणातील बदल नियंत्रित करण्यास कशाप्रकारे मदत करतात, या विषयी महत्त्वपूर्ण माहिती हाती आली आहे.

मातीतील ओलाव्याचा वातावरण, पावसावरील परिणाम अभ्यासण्यासाठी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील (आयआयटीएम) शास्त्रज्ञांनी संशोधन केले. या संशोधनात डॉ. मधुसूदन इंगळे, डॉ. भूपेंद्र बहादूरसिंग, डॉ. मिलिंद मुजुमदार, डॉ. मंगेश गोस्वामी, डॉ. नरेश गणेशी, डॉ. सी. डी. अजू, डॉ. आर. कृष्णन, डॉ. एम. रविचंद्रन यांचा या संशोधनात सहभाग आहे. या संशोधनाचा ‘पर्सिस्टन्स इन फिजिकल सिस्टीम : ॲन ॲप्लिकेशन टू सॉइल मॉइश्चर मेमरी’ हा शोधनिबंध फिजिकल रिव्ह्यू लेटर्स या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. डॉ. भूपेंद्र बहादूर सिंह यांच्या नेतृत्वाखालील संशोधन प्रयोगशाळेत हे संशोधन करण्यात आले.

डॉ. इंगळे म्हणाले, ‘भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी मान्सून ही जीवनरेखा आहे, तसेच मातीतील ओलावाही तितकाच महत्त्वाचा आहे. पाऊस आणि मातीचा ओलावा यांचा परस्परसंबंध हा अत्यंत गुंतागुंतीच्या वातावरणीय प्रक्रियांवर आधारित आहे. पावसाचा मृदेवर होणारा परिणाम सर्वश्रुत आहे, परंतु मातीची ‘स्मृती’ म्हणजे भूतकाळातील पाऊस किंवा दुष्काळ यांचा ठसा ती किती काळ राखून ठेवते, त्याचा पुढील पावसावर काय परिणाम होतो, हे मात्र तुलनेने कमी समजले आहे. त्यामुळे माहिती-सिद्धान्ताच्या ‘गूढ पण विश्वासार्ह’ तत्त्वांवर आधारित नवीन पद्धत विकसित करण्यात आली.’
‘नवीन पद्धत अत्यंत व्यापक आणि काटेकोर असल्याने त्याद्वारे माती भूतकाळातील पावसाची किंवा दुष्काळाची माहिती किती काळ जपू शकते, याचे रास्त अनुमान बांधता येते. या कालावधीला मातीचा स्मरणकाल (मेमरी टाइम्स्केल) म्हणतात. हा कालावधी भविष्यातील हवामानाचे प्रारूप अधिक अचूक करताना मातीची भूमिका समजून घेण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. भारताच्या मुख्य मान्सून प्रभावित क्षेत्रावर (ज्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातचा काही भाग यांचा समावेश होतो) केलेल्या विश्लेषणानुसार, मातीचा स्मरणकाळ साधारणतः एक महिन्यापेक्षा थोडा अधिक आहे. म्हणजेच, आज झालेल्या पावसाच्या परिणामस्वरूप माती महिन्यापेक्षा थोडा अधिक काळ जमिनीजवळच्या वातावरणाला प्रभावित करू शकते. या संशोधनातून आलेले निष्कर्ष दुष्काळ आणि पूरस्थितीच्या शक्यतांचे सखोल आकलन करण्याच्या पुढील संशोधनात उपयुक्त ठरतील,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

‘नवीन पद्धतीने मिळालेला मातीचा स्मरणकाळ हा पारंपरिक पद्धतींपेक्षा कमी असला, तरी वैज्ञानिकदृष्ट्या अधिक सुसंगत आहे. पारंपरिक पद्धतींनी हे कालमान जवळपास दुप्पट येते. मातीच्या स्मरणकालाचे अचूक मापन करण्यासाठी सुधारित निरीक्षणे अत्यावश्यक आहेत. अशी निरीक्षणे हवामान व वातावरणीय अंदाज, तसेच जलविज्ञान प्रारूपांना अचूक बनवण्यास मदत करतील,’ असे डॉ. भूपेंद्र बहादूरसिंग यांनी नमूद केले.

शेती क्षेत्रासाठी उपयुक्त

शेतीच्या सिंचनाच्या गरजा वेळेवर आणि योग्य प्रमाणात भागवणे आवश्यक आहे. त्यामुळे नव्या पद्धतीने केलेल्या संशोधनाचे परिणाम शेती क्षेत्रासाठीही महत्त्वाचे आहेत. मात्र, त्यासाठी अधिक क्षेत्रीय निरीक्षणे आणि मातीच्या भौतिक गुणधर्मांची माहिती आवश्यक असल्याचेही शास्त्रज्ञांनी अधोरेखित केले.