पुणे: आंबेगाव बुद्रुक येथील बेकायदा अकरा इमारतींवर कारवाई केल्यानंतर गेल्या तीन वर्षांतील बेकायदा बांधाकामांना दिलेल्या नोटिशी आणि त्यावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी मागविला आहे. त्यासाठी नगर अभियंता आणि अतिरिक्त आयुक्तांची समिती स्थापन करण्यात आली असून, पुढील आठवड्यात या सर्व प्रकरणांचा आढावा घेण्यात येणार आहे. तर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर महापालिका गुन्हे दाखल करणार आहे.

आंबेगाव बुद्रुक येथील बेकायदा ११ इमारतींवर महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. बेकायदा बांधकामांना महापालिकेकडून नोटीस बजाविण्यात आल्यानंतरही कारवाई करण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षांतील बेकायदा बांधकामांना बजाविण्यात आलेल्या नोटिशींची माहिती मागविण्यात आल्याचे आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी मंगळवारी सांगितले.

हेही वाचा… आंबेगावातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा धडाका

अतिरिक्त आयुक्त आणि नगर अभियंता यांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीकडून गेल्या तीन वर्षांत किती बांधकामांना नोटिसा दिल्या गेल्या आहेत, याची माहिती घेतली जाणार आहे. त्याचा अहवाल ही समिती १२ जानेवारीपर्यंत सादर करणार आहे. त्यानंतर आढावा घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तसेच फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे कुमार यांनी सांगितले. सदनिका खरेदी करताना रेरा आणि महापालिकेच्या संकेतस्थळावरून बांधकामाला परवानगी आहे का, याची माहिती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

संकेतस्थळावर अधिकृत बांधकामांची माहिती

नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी महापालिकेकडून शहरातील अधिकृत बांधकाम व्यावसायिकांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेचे कामकाज ऑनलाइन

महापालिकेचे कामकाज १०० टक्के ऑनलाइन केले जाणार आहे. सध्या महापालिकेच्या ६० पैकी १६ विभागांचा कार्यभार ऑनलाइन करण्यात आला असून, येत्या दोन महिन्यांत उर्वरित सर्व विभागांचा कारभार ऑनलाइन केला जाणार असून, प्रकरणांची माहिती नागरिकांना मिळणार आहे.