पुणे : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाला आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थात ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ घेता येणार नसल्याचे स्पष्टीकरण राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिले आहे. ‘ईडब्ल्यूएस’चे प्रमाणपत्र सादर केलेल्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी अर्जात योग्य बदल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सीईटी सेलने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. सध्या अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, एमसीएसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रिभूत प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. अर्ज करताना विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रे सीईटी सेलच्या संकेतस्थळावर अपलोड करावी लागतात. त्यानुसार आता सीईटी सेलकडून उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जांची छाननी करण्यात येत आहे. त्यात आरक्षित प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांनी ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ मिळण्यासाठी प्रमाणपत्र सादर केली आहेत. मात्र, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागास वर्ग (ओबीसी), भटक्या जाती (व्हीजे), भटक्या जमाती (एनटी), सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास (एसईबीसी), विशेष मागास वर्ग (एसबीसी) अशा आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ घेता येणार नसल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर केलेल्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी संबंधित आरक्षित प्रवर्गासाठी आवश्यक कागदपत्रांसह तक्रार निवारण कालावधीमध्ये अर्जामध्ये योग्य ते बदल करून घ्यावेत, तक्रार निवारण कालावधी उपलब्ध नसलेल्या वैद्यकीय, आयुष अशा अभ्यासक्रमांसाठी उमेदवारांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीपर्यंत अर्जात बदल करण्याचे ‘सीईटी सेल’ने स्पष्ट केले आहे.