आळंदी : आळंदी मंदिर विश्वस्त निवडीवरून नाराज असलेल्या आळंदीकरांनी उद्या मंगळवारी बंदची हाक दिली आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीवर आळंदीतील ग्रामस्थांना डावलल्याबद्दल निषेध करण्यासाठी आळंदी बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबत आळंदी पोलिसांना देखील पत्र देण्यात आले आहे. ऐन कार्तिकी यात्रा आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यादरम्यान बंदची हाक दिल्याने लाखो वारकऱ्यांची गैरसोय होऊ शकते.
आळंदीतील ग्रामस्थ असून गावातील व्यक्तींना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीवर आज पर्यंत घेण्यात आले नाही. त्यांच्या मुलाखती घेऊनही योग्य व्यक्तीची निवड केली नाही, असा आरोप आळंदीकरांनी पत्रात केला आहे. याचा निषेध करण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने आणि शांततापूर्वक पद्धतीने उद्या मंगळवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आळंदी बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी दहा वाजता चाकण चौक ते बहादुर चौक यादरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची सांगता सभेत होणार आहे.
हेही वाचा : एनएमएमएसएस शिष्यवृत्ती अर्जांसाठी मुदतवाढ; ३१ डिसेंबरपर्यंत संधी
नुकतीच तीन जणांची विश्वस्तपदी निवड करण्यात आली
आळंदी देवस्थानच्या विश्वस्त पदाच्या सहा रिक्त जागांसाठी इच्छुक अर्जदारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर तीन जणांची विश्वस्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. भावार्थ देखणे, ॲड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ या तिघांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी या नेमणुकांबाबत आदेश दिला.
मंदिर विश्वस्त विकास ढगे म्हणाले, उद्या कार्तिकी यात्रेची सुरुवात आहे. आळंदी ग्रामस्थांनी एक दिवस बंदची हाक दिली आहे. आमचे, ग्रामस्थांचे आणि मंदिर प्रशासन, विश्वस्तांचे ऋणानुबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही. माऊलींच्या श्रद्धेपोटी वारकरी येत आहेत. आळंदी ग्रामस्थांनी आजपर्यंत वारकऱ्यांना ज्या पद्धतीने पाहुणचार दिला आहे. त्याच पद्धतीने त्यांचा पाहुणचार होणं गरजेचं आहे. आळंदीच्या संपूर्ण ग्रामस्थांना आवाहन आहे की उद्याचा बंद जो आहे तो करू नये, ही विनंती आहे.