पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या अंतर्गत आतापर्यंत १ लाख ४७ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आता शाळा प्रवेशासाठी सोडत काढावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

आरटीईअंतर्गत वंचित, आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. त्यानुसार खासगी शाळांतील प्रवेशासाठीची अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा राज्यभरातील ९ हजार १९७ शाळांमध्ये १ लाख ४ हजार ७३८ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. ३१ मे ही अर्ज नोंदणीसाठीची अंतिम मुदत आहे. त्यामुळे आतापर्यंत आलेल्या १ लाख ४७ हजार अर्जांमध्ये आणखी अर्जांची भर पडणार आहे. उपलब्ध जागांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याच प्रवेशासाठी सोडत काढावी लागते. त्यामुळे उपलब्ध जागांपेक्षा जास्त अर्ज आले असल्याने आता प्रवेशासाठी सोडत काढावी लागणार आहे.

हेही वाचा : पुणे: खिशावर येणार ताण… पालेभाज्या, फळभाज्यांच्या दरात वाढ किती?

शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाच्या नियमात बदल केल्यानंतर खासगी शाळा, विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगळल्या गेल्या होत्या. त्यामुळे शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेशासाठी केलेल्या नोंदणीत जेमतेम ६८ हजार अर्ज दाखल झाले होते. मात्र न्यायालयाने या बदलाला स्थगिती दिल्यानंतर शिक्षण विभागाला आरटीई प्रवेश प्रक्रिया जुन्याच पद्धतीने राबवण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे जुन्या पद्धतीने राबवण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेत खासगी, इंग्रजी माध्यमाच्या शाळांचाही समावेश असल्याने पालकांकडून प्रवेश प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : पुणे : रिक्षाचालकाची पोलीस शिपायाला मारहाण; काय आहे प्रकरण?

दरम्यान, अर्ज नोंदणीसाठी दिलेल्या मुदतीत किती अर्ज येतात याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर अर्ज करायचे राहून गेले असल्यास त्यांना संधी मिळण्यासाठी नोंदणीसाठी मुदतवाढीचा विचार करण्यात येईल. त्यानंतर प्रवेशासाठीची सोडत काढण्याचे नियोजन केले जाईल, असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.