पुणे : राज्यभरातील गिग कामगार संघटनेचे रिक्षा आणि कॅबचालक एकत्र येऊन गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत आंदोलनाला बसले आहेत. पुण्यातील चालकांचाही यामध्ये समावेश आहे. या संधीचा फायदा घेऊन इतर चालकांनी प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारण्यास सुरुवात केल्याने गैरसोय झाल्याचे म्हणणे अनेक प्रवाशांनी मांडले. मात्र, यावर अधिकृत तक्रार अद्याप प्राप्त झाली नसून, प्रवाशांची कुणी अडवणूक करीत असेल, तर कारवाई करण्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिला आहे.
परिवहन विभागाने निश्चित केलेले दर ओला, उबेर, रॅपिडोसारख्या कंपन्यांना लागू करावेत, त्यासाठी एकच ऑनलाइन यंत्रणा निश्चित करावी या मागणीसाठी पुण्यातील रिक्षा आणि कॅबचालक मुंबईतील आझाद मैदान येथील आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक, स्वारगेट, वाकडेवाडी ‘एसटी’महामंडळाचे आगार तसेच गर्दीच्या ठिकाणी रिक्षा आणि कॅबचालकांची संख्या कमी दिसत आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन इतर रिक्षा, कॅबचालक जादा दर आकारत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या.
पुणे रेल्वे स्थानक आणि लोहगाव विमानतळावरील काही प्रवाशांना याबाबत विचारले असता, पुणे रेल्वे स्थानकापासून शिवाजीनगरपर्यंत ६० ते ७० रुपये, स्वारगेटपर्यंत १०० ते १५० रुपये, वाकडेवाडी बस स्थानकावरून स्वारगेटसाठी १८०-२०० रुपये, तर याहून अधिक अंतरासाठी २०० रुपयांहून अधिक रुपये चालक मागत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली. खासगी कॅबचालकही २५० ते ३०० रुपये आकारत होते. विमानतळावरून कुठेही जाण्यासाठी प्रवाशांकडून सरसकट सातशे रुपये मागितले जात होते, असे एका प्रवाशाने सांगितले.
पुणे स्थानकावरून उतरल्यानंतर प्रवासी साहित्य, पिशव्या जास्त असल्यामुळे स्वारगेट, मित्र मंडळ चौकात जाण्यासाठी रिक्षाचालकांना विचारणा केली. दोन ते तीन रिक्षाचालकांनी ३५० रुपये मागितले. अखेर ३०० रुपये ठरवून पुढचा प्रवास करावा लागला, असे प्रवासी शैलजा कुंभार यांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत अद्याप तक्रार प्राप्त झाली नाही. रिक्षाचालकांनी ठरवून दिलेल्या दरानुसार मीटरने भाडे आकारावे. मीटरव्यतिरिक्त जादा पैशांची मागणी करीत असल्यास प्रवाशांनी तक्रार करावी. वायुवेग पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गिग कामगार संघटनेच्या मागण्यांबाबत बुधवारी (१६ जुलै) परिवहनमंत्री प्रताप सरनाई यांनी शिष्टमंडळाबरोबर बैठक घेतली. मात्र, बैठकीतील चर्चा निष्फळ ठरली, असे भारतीय गिग कामगार मंचाचे अध्यक्ष डाॅ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.