पिंपरी : भोसरी येथून चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जेसीबीचालकाचा खून करून त्याच्या शरीराचे पाच तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी मृतदेहाचे पाच तुकडे करून ठिकठिकाणी फेकून दिले. त्याचे धड मोशी येथील खाणीत आढळून आल्याने खुनाचा उलगडा झाला. सिद्धाराम प्रभू ढाले (वय ४५, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे खून झालेल्या जेसीबीचालकाचे नाव आहे. सिद्धाराम यांच्या पत्नीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धाराम हे जेसीबीवर चालक म्हणून काम करीत असत. २९ मार्च रोजी सिद्धाराम सकाळी घरातून कामासाठी बाहेर पडले. ते परत आले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते सापडत नसल्याने ३१ मार्च रोजी भोसरी पोलीस ठाण्यात सिद्धाराम यांची बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने दिली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. २ एप्रिल रोजी दुपारी चारच्या सुमारास मोशी येथील कानिफनाथ मंदिरासमोरील खडी मशिन खाणीमध्ये स्थानिकांना सिद्धाराम यांचा मृतदेह आढळला. त्यांनी तत्काळ पोलिसांना हा प्रकार कळविला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृतदेहाजवळ सिद्धाराम यांचा मोबाइल सापडल्याने त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली. मात्र, खाणीमध्ये त्यांचे केवळ धड होते. त्यांच्या शरीराचे पाच तुकडे करण्यात आले असून, चेहरा आणि डोक्याचा भाग, तसेच डावा पाय, दोन्ही हात शरीरापासून वेगळे करण्यात आले आहेत. आरोपींनी हे चार तुकडे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने इतर ठिकाणी टाकले आहेत. पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.