पिंपरी : ‘शहरातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहायला हवी. महिलांना मानसन्मान मिळाला पाहिजे. त्यांची फसवणूक, अडवणूक हाेता कामा नये. काेणाचीही गुंडगिरी, दादागिरी, दहशत अजिबात चालता कामा नये, सर्वसामान्य नागरिकांवर सत्ताधारी, विराेधक किंवा गुंड प्रवृतीची व्यक्ती अन्याय करत असेल, तर त्यांचा बंदोबस्त करावा,’ असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पोलिसांना दिले.

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पवार यांनी शनिवारी चिंचवड येथे जनसंवाद सभा घेतली. त्याला नागरिकांची मोठी गर्दी झाली. या वेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

काही जणांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार रहाटणी, पिंपळे सौदागर येथील गृहनिर्माण सोसायटीतील महिलांनी पवार यांच्याकडे केली. पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. त्यावर पवार म्हणाले, ‘शहरातील कायदा-सुव्यवस्था चांगली राहावी, यासाठी मी आग्रही असताे. लाडक्या बहिणींना, महिलांना मानसन्मान मिळाला पाहिजे. त्यांची फसवणूक, अडवणूक हाेता कामा नये, त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. शहरात कोणाचीही गुंडगिरी, दादागिरी, दहशत अजिबात चालता कामा नये, सर्वसामान्य नागरिकांवर सत्ताधारी, विराेधक किंवा गुंड प्रवृतीची व्यक्ती अन्याय करत असेल, तर अशांचा बीमोड करण्यात यावा.’

पाणीपुरवठ्याच्या सर्वाधिक तक्रारी

‘स्वच्छ, मुबलक पाणी मिळत नाही, पाणीपुरवठा विस्कळीत असतो, चांगले रस्ते नाहीत, कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लागत नाही, अशा तक्रारी सर्वाधिक होत्या,’ असे अजित पवार यांनी सांगितले. नगरविकास, कामगार, सामाजिक यांसह विविध विभागांशी संबंधित प्रश्न नागरिकांनी सांगितले. काही प्रश्न तत्काळ फाेन लावून मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्याचेही ते म्हणाले.

अजब सल्ल्याचे गाऱ्हाणे

रस्त्याचा चढ तीव्र केल्याने मोटार वरती जात नसल्याची तक्रार करणाऱ्या कासारवाडी येथील एका ज्येष्ठ नागरिकाला महापालिका प्रशासनाने मोटार विकण्याचा अजब सल्ला दिला. त्यामुळे हा ज्येष्ठ नागरिक तक्रार घेऊन जनसंवादमध्ये आला. त्यांनी पवार यांच्याकडे तक्रार केली. त्यावर तक्रार तत्काळ निकाली काढण्याचा आदेश पवार यांनी दिला.

जनसंवादमध्ये अनेकांचे प्रश्न जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. यापुढील काळातही नागरिकांशी जनसंवाद सुरूच ठेवणार आहे. – अजित पवार, उपमुख्यमंत्री