पिंपरी- चिंचवड: चऱ्होली परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच दर्शन झालं आहे. चऱ्होली परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चऱ्होली येथे वारंवार बिबट्या दिसत आहे. कस्तुरी अपार्टमेंट येथे बिबट्या वावरताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. बिबट्याची दहशत परिसरात पसरली आहे.
भक्ष्याच्या शोधात बिबट्या नागरी वस्तीत शिरकाव करत आहेत. पिंपरी- चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याला वावरताना वनविभागाने जेरबंद केलं होतं. मावळ, मुळशी, चाकण, आळंदी पाठोपाठ आता चऱ्होली परिसरात बिबट्याच दर्शन होत आहे. मुक्तपणे बिबट्या वावरत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. रात्री फिरणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे.
रात्री परिसरात शांतता असल्याने बिबट्या भक्ष्याच्या शोधात थेट नागरी वस्तीत शिरकाव करतो आहे. कधी सुरक्षा भिंतीवर तर कधी घनदाट झाडीत बसलेल्या बिबट्या नागरिकांना दिसत आहे. बिबट्याची दहशत पसरल्याने रात्री नागरिक घराबाहेर पडत नाहीत. दिवसा लहान मुलांना घराबाहेर खेळणं सोडणं पालकांसाठी अवघड झाले आहे. लवकरात लवकर वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.