पिंपरी : बनावट शेअर ट्रेडिंग अ‍ॅपमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत हिंजवडी येथील एकाची पाऊणकोटीची फसवणूक करणार्‍या टोळीतील दोघांना पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने छत्रपती संभाजीनगर येथे जेरबंद केले. आरोपींच्या बँक खात्यात चार कोटीचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.

साजिद शहा कासम शहा (३०), अभिजित रामराव श्रीरामे (३२, दोघे रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या इतर साथीदांराचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी याबाबत माहिती दिली. हिंजवडी येथील एकाने फसवणूक प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. जुलै २०२४ मध्ये फिर्यादी फेसबुक पाहत असताना ट्रेडींग बाबतची जाहिरात आली. जाहिरीतीमधील लिंक क्लिक केली असता, त्यांना एका व्हाटसअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्यानंतर संशयितांनी तक्रारदाराला अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. अ‍ॅपमार्फत शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. बँक खात्यावर ७४ लाख घेऊन फसवणूक केली. या गुन्ह्याचा सायबर सेलमार्फत समांतर तपास सुरू होता. बँक खात्याबाबत तांत्रिक विश्लेषण केले असता, त्यामधील संशयित हे छत्रपती संभाजीनगरचे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सायबर सेलचे पथक छत्रपती संभाजीनगर येथे गेले.

हेही वाचा : लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून रिक्षात ठेवला मृतदेह, प्रियकर फरार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पथकाने तांत्रिक विश्लेषण करून खातेधारक साजिद आणि अभिजित यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन मोबाईल जप्त केले. संशयितांनी फसवणुकीसाठी वापरलेल्या बँकेच्या खात्यावरून फसवणूक झाल्याप्रकरणी ‘एनसीसीआर पोर्टल’वर ५६ तक्रारी दाखल आहेत. त्याच खात्यामध्ये चार कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, फौजदार सागर पोमण, पोलिस अंमलदार दीपक भोसले, अतुल लोखंडे, प्रिया वसावे, अशोक जावरे, श्रीकांत कबुले, अभिजीत उकीरडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.