पुणे शहरात आज दिवसभरात ११०० नवे करोनाबाधित आढळले, तर ३९ रुग्णांचा मृत्यू झाला. याचबरोबर शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २० हजार ७५७ झाली आहे. तर आजअखेर २ हजार ८३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ४५६ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजपर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या १ लाख ५३२ झाली असल्याची माहिती, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

राज्यात सर्वात आधी करोनाचा रुग्ण सापडलेला पुणे जिल्हा सध्या वेगानं वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराचा वेळीच उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाला होता. त्यामुळे करोना रुग्णांना मिळणाऱ्या उपचारासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

देशभरासह राज्यातील करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अद्यापही वाढत आहे. आज राज्यात १७ हजार ६६ नवे करोनाबाधित आढळले असून, २५७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. शिवाय, १५ हजार ७८९ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना आज रुग्णालयांमधून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १० लाख ७७ हजार ३७४ वर पोहचली आहे.

आजपर्यंत राज्यात ७ लाख ५५ हजार ८५० जण करोनामुक्त झाले असून, राज्याचा रिकव्हरी रेट ७०.१६ टक्के आहे. आजपर्यंत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या ५३ लाख २१ हजार ११६ नमून्यांपैकी आजपर्यंत १० लाख ७७ हजार ३७४ नमूने (२०.२ टक्के) पॉझिटिव्ह आढळले आहेत. सद्यस्थितीस राज्यात १७ लाख १२ हजार १६० जण होम क्वारंटाइन आहेत, तर ३७ हजार १९८ जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये आहेत.