पुणे : पूर्ववैमनस्यावरुन तरुणावर वार करून पळून गेलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने अवघ्या दोन तासांमध्ये वारजे येथे जेरबंद केले. हर्षद संदीप वांजळे (वय १८, रा. औदुंबर कॉलनी, वारजे) असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. तरुणावर वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा हवेली पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यातील घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रीकरण हवेली पोलिसांनी सर्वत्र पाठविले होते. दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना खुनाचा प्रयत्न करुन पळून गेलेले आरोपी वारजेमधील असून नऱ्हे येथील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये थांबल्याची माहिती मिळाली. हे ही वाचा.खुनाची दीड महिन्यांपासून रेकी, वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी तीन पिस्तुलांचा वापर पोलिसांनी नऱ्हे येथून दोघांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईकरीता त्यांना हवेली पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, पोलीस अंमलदार हवालदार प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, बाळु गायकवाड, पोलीस नाईक रवींद्र लोखंडे, साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर यांनी केली.