पुणे : शिवाजीनगर मतदार संघाचे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मतदार संघातील गोखलेनगर भागात ६० लाख लिटर पाण्याच्या टाकीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी तीन वाजता केले जाणार होते.पण त्यापूर्वीच आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी आणि माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी कार्यकर्त्यांसह पाण्याच्या टाकीचे उद्घाटन केले.

पण त्या दरम्यान पोलीस अधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादाचा प्रकार देखील घडला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर या घटनेचे वार्तांकन करण्यास येणार्‍या पत्रकारांना आतमध्ये जाण्यापासून पोलिसांकडून रोखण्यात आले होते. त्यावरून पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वादाचा प्रकार घडला.

हेही वाचा : पुणे : अजित पवारांच्या आधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले उद्घाटन; काही काळ तणावाचे वातावरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वादाच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या सर्व घडामोडींच्या दरम्यान अजित पवार यांनी शिवाजीनगर भागातील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन कार्यक्रमाला येणार नसल्याचे कळविले. तर या कार्यक्रमासह पुणे शहर आणि ग्रामीण भागातील इतर पाच कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अचानकपणे रद्द केले. हे सर्व कार्यक्रम अजित पवार यांनी अचानकपणे का रद्द केले असावेत, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.