पुणे : हिंजवडीतील नागरी समस्या सोडविण्यासंदर्भात विविध उपाययोजना सुरू असून ओढ्यांवर बांधलेल्या इमारती पाडण्याचे आदेश जिल्हा प्रशासनासह संबंधित यंत्रणांना दिले आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी येथे रविवारी दिली. हिंजवडीत किती पाऊस पडतो, किती पाणी येते, कोणते ओढे बुजवले गेले आहेत, याची माहिती घेतली जात असून बुजवलेले सर्व ओढे नदीपर्यंत प्रवाहित केले जातील, असेही त्यांनी सांगितले. अजित पवार यांनी विधानभवनामध्ये विविध विषयांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हिंजवडीतील नागरी समस्यांसंदर्भात गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी रस्त्यांची कामे करताना आड येणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र गेल्या महिन्यात हिंजवडीत पूर परिस्थिती निर्माण होऊन हाहाकार माजला. तशी परिस्थिती आता ओढावणार नाही,’ असे सांगतानाच विविध उपाययोनजांबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.

पवार म्हणाले,‘जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि औद्योगिक महामंडळ यांच्याकडे सर्वेक्षणाची जबाबदारी दिली होती. त्यानुसार काम सुरू झाले आहे असून अनधिकृत बांधकामे हटवली जात आहेत. रस्त्यांची कामे सुरू झाल्याने प्रश्न सुटायला सुरुवात झाली आहे. हिंजवडीत किती पाऊस पडतो, किती पाणी येते, कोणते ओढे बुजवले आहेत, याबाबत सर्वेक्षण सुरू आहे. ओढ्यांवर बांधलेल्या इमारती पाडण्याचे आदेश दिले आहेत. या इमारती फार मोठ्या असतील तर मार्ग काढून ओढे नदीपर्यंत प्रवाहित केले जातील.’

‘लक्ष्मी चौक ते उड्डाणपूल, घोटवडे-माण-हिंजवडी-मारूंजी-कासारसाई, पाषाण-सूस-पिरंगुट, म्हाळुंगे-घोटवडे या रस्त्यांची कामे करण्याची सूचना दिली आहे. ओढ्यात भाजीमंडईसारखे आरक्षण दाखविण्याच्या चुका ग्रामपंचायतींनी केल्या आहेत. ग्रामपंचायतींना सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी जागा देण्याची सूचना प्रशासनाला केली आहे,’असेही पवार यांनी सांगितले.

धोकादायक पूल पाडण्यासाठी समिती

जिल्ह्यातील धोकादायक पुलासंदर्भात जिल्हाधिकारी यांची समिती नेमली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधिमंडळात समितीची घोषणा केल्याने सचिवांच्या या समितीला अधिक महत्त्व आहे. जिल्हाधिकारी सर्व माहिती या समितीला देतील. त्यानंतर सचिव निर्णय घेतील. मात्र, धोकादायक आणि वापरासाठी योग्य नसलेले पूल पाडण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला केली आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आमदार रोहित पवार यांच्यावर मुंबईतील आझाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जबाबदारीचे भान विसरले आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, तू जबाबदारी विसरला का, हे मी रोहितला विचारतो, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. यशवंतरावांनी सांगितलेली सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण सर्व लोकप्रतिनिधींनी केवळ ऐकायची नाही तर कृतीत आणावी लागेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.