पुणे : टेम्पोच्या धडकेत तीन वर्षांच्या बालकाचा मृत्युमुखी झाल्याची घटना आंबेगाव भागातील जांभूळवाडी परिसरात घडली. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलताब नवशाद सलमानी (वय ३) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत इरशाद मेंहदीहसन सलमानी (वय २२, रा. अर्जुननगर, कोळेवाडी रोड, जांभूळवाडी) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरशाद सलमानी यांचा पुतण्या अलताब जांभूळवाडी परिसरातील रस्त्यावर खेळत होता. त्या वेळी भरधाव टेम्पोने अलताबला धडक दिली. अपघातात अलताब गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी जांभूळवाडी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.
कोथरूड भागात दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू
भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना कोथरूड भागात घडली. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. पांडुरंग पोपटराव लांडे (वय ७०, रा. कोथरूड) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत आशिष पांडुरंग लांडे (वय ३८) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग लांडे हे गुरुवारी (८ मे) सकाळी पावणेआठच्या सुमारास कर्वे रस्त्याने निघाले होते. कोथरूड परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या लांडे यांना भरधाव दुचाकीने धडक दिली. अपघातानंतर लांडे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करत आहेत.
वेल्डिंगचे काम करताना कामगाराचा मृत्यू
वेल्डिंगचे काम करताना कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गंज पेठेत घडली. सुरक्षेविषयक काळजी न घेता दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी खडक पोलिसांनी घरमालकासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला.
रोहित बाळू पवार (वय २८, रा. घोरपडे पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत पवार यांची पत्नी चैत्राली (वय २२) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रोहिदास वसंत अडागळे (रा. गंज पेठ), कैलास जालिंदर सकट (रा. लोहियानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित गंज पेठेतील फकीर गल्लीत दुमजली घरात २६ ऑगस्ट २०२३ रोजी वेल्डिंगचे काम करत होते. त्या वेळी पहिल्या मजल्यावरून त्यांचा मृत्यू झाला होता. कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षाविषयक साधने उपलब्ध करून न दिल्याने दुर्घटना घडल्याचे रोहित यांची पत्नी चैत्राली यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. याबाबत चैत्राली यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे तपास करत आहेत.