लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: वाढत्या उन्हाबरोबर पाण्याची मागणीही वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास नळजोड तोडण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सव्वा तीन वर्षांपासून दिवसाआडच पाणी पुरवठा सुरू आहे. महापालिका दिवसाला ५१० एमएलडी पाणी धरणातून उचलते. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. पवना धरणातील पाणीपातळी सातत्याने घटत आहे. धरणात सध्या ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

हेही वाचा… पिंपरी महापालिकेची बेकायदा जाहिरात फलकांवरील कारवाई संथगतीने

दुसरीकडे अनेक नागरिक पिण्याच्या पाण्याने अंगण, रस्ते, पार्किंगचा परिसर, जिने व वाहने धुतात. झाडे, बागांना पिण्याचे पाणी घालतात. अनेक घर, बंगले व इमारतींवरून पाण्याच्या टाक्‍या भरून वाहत असतात. काहीजण रस्त्यावर पाणी सोडून देतात. काही वॉशिंग सेंटरचालक पिण्याचे पाणी वापरतात. बांधकामांसाठीही पिण्याचे पाणी वापरले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यापार्श्वभूमीवर पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नागरिकांनी पाण्याची नासाडी करु नये. जपून वापर करावा. पिण्याचे पाणी वाया घालवणे. टाक्या भरुन वाहणे, नळ चालू ठेवणा-या लोकांना नळजोड तोडण्याची नोटीस दिली जाईल. त्यानंतरही सुधारणा नाही झाल्यास नळजोड तोडले जातील.” – श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता पाणीपुरवठा विभाग पिंपरी-चिंचवड महापालिका