पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास उपचार करण्यासाठी ‘कोड ब्ल्यू’ यंत्रणा जुलै २०२३ मध्ये कार्यान्वित करण्यात आली. ही यंत्रणा सुरू करणारे ससून हे राज्यातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले होते. या यंत्रणेमुळे वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत केवळ १२० सेकंदांत रुग्णाला उपचार मिळत असून, गेल्या दोन वर्षांत दररोज सुमारे सहा जणांना ही मदत मिळाली आहे.
ससूनमध्ये ‘कोड ब्ल्यू’ची सुरुवात १ जुलै २०२३ रोजी झाली. रुग्णालयात १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत ९७२ वेळा यंत्रणेचा वापर झाला. त्यानंतर २०२४ मध्ये या यंत्रणेचा २ हजार ४०२ वेळा वापर झाला. यावर्षी जानेवारी ते २३ मेदरम्यान १,०२२ वेळा या यंत्रणेचा वापर झाला. ससूनमध्ये ‘कोड ब्ल्यू’ सुरू झाल्यापासून जुलै २०२३ ते मे २०२५ या कालावधीत एकूण ४ हजार ३९६ रुग्णांवर आपत्कालीन स्थितीत उपचार झाले आहेत. त्यातील ५० टक्के रुग्ण श्वास घेण्यास त्रास होणारे आणि १५ टक्के रुग्ण हे हृदयक्रिया बंद पडलेले होते. या रुग्णांना वाचविण्यात यश आले. मात्र, आपत्कालीन उपचार करूनही ३० ते ३५ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले रुग्ण हे सहव्याधी आणि कर्करोगासह इतर गंभीर आजार असलेले होते, अशी माहिती ससून रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली.
ससून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे तीन हजार रुग्ण येतात. त्यांच्यासमवेत त्यांचे नातेवाईक असतात. याचबरोबर रुग्णालयात दाखल रुग्ण आणि त्यांचेही नातेवाईक असतात. एखाद्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यास अथवा श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास तातडीने उपचार करण्याची परिस्थिती उद्भवते. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यास पहिले दहा मिनिटे हा सुवर्णकाळ मानला जातो. त्या कालावधीत उपचार झाल्यास रुग्ण वाचण्याची शक्यता जास्त असते. हाच विचार करून ससूनमध्ये ‘कोड ब्ल्यू’ यंत्रणा सुरू झाली. या यंत्रणेसाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून, ते २४ तास उपलब्ध आहे. या पथकात डॉक्टर, भूलतज्ज्ञ, औषधशास्त्र तज्ज्ञ, परिचारिका आणि परिचरांचा समावेश आहे. डॉ. किरण जाधव हे ‘कोड ब्ल्यू’चे मुख्य समन्वयक असून, गौरव महापुरे हे समन्वयक आहेत.
‘कोड ब्ल्यू’ कशाप्रकारे काम करते…
- रुग्णालयात वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास ध्वनिक्षेपक यंत्रणेवरून उद्घोषणा.
- रुग्णालयातील कोणत्याही विभागातून सात क्रमांक डायल करून ‘कोड ब्ल्यू’ पथकाला पाचारण करण्याची सुविधा.
- कोड ब्ल्यू पथकाकडून १२० सेकंदांच्या आत संबंधित रुग्णाकडे धाव घेऊन त्याच्यावर तातडीचे उपचार.
ससूनमधील ‘कोड ब्ल्यू’
कालावधी – उपचार झालेले रुग्ण
१ जुलै ते ३१ डिसेंबर २०२३ – ९७२
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ – २,४०२
१ जानेवारी ते २३ मे २०२५ – १,०२२
एकूण रुग्ण – ४,३९६