पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाची आगामी निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होणार असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा आज वाढदिवस असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी शुभारंभ लॉन्स येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. यावेळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी संवाद देखील साधला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार पुणे शहराच्या राजकारणात सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मागील सात महिन्यांपासून दररोज आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीला काहीच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना अजित पवार व सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक भागांत दौरे आणि मेळावे घेत आहेत. त्याच दरम्यान अजित पवार यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासोबतच छोटे चिरंजीव जय पवारही आता बारामतीत सक्रिय झाले आहेत.

हेही वाचा : पावणेतीन कोटींची दारू जप्त : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

जय पवार यांनी राष्ट्रवादी भवनला नुकतीच भेट देऊन सोशल मीडिया टीमची नेमणूक केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्या सूचनेनुसार काम करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी बारामती दौरा केला होता. जय पवार यांनी पुण्यातील शुभारंभ लॉन्स येथील अभिष्टचिंतन सोहळ्यास हजेरी लावली. तर कार्यक्रमाला येणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्यासोबत त्यांनी संवाद देखील साधला. मात्र प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधणे त्यांनी टाळले.