पुणे : अवेळी पंचविसाव्या आठवड्यात झालेला जन्‍म आणि जन्मावेळी असलेले फक्‍त ७०० ग्रॅमचे वजन अशा आव्हानांवर मात करीत या बाळाला वाचविण्यात यश आले आहे. या बाळाला तब्बल ९३ दिवसांनतर सुखरूपपणे त्याच्या घरी पाठविण्याची कामगिरी पुण्यातील डॉक्टरांनी केली आहे. अहमदनगरमधील एका रुग्णालयात मेघना रावने (नाव बदललेले) या बाळाला जन्‍म दिला. त्यावेळी गर्भाशयातील अपुरे पाणी, त्याची होणारी गळती याशिवाय गर्भाशयाचे तोंड झाकणारी नाळ आणि मातेच्या योनीमार्गात पॉझिटिव्ह ई कोलाय संसर्ग यासारख्या गंभीर गुंतागुंतीमुळे सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागली. या गंभीर परिस्थितीमुळे नवजात बाळाला धोका निर्माण झाला. जन्मानंतर लगेचच बाळाला श्वासोच्छवासाचा गंभीर त्रास होऊ लागला, ज्यामुळे त्‍याला त्‍वरित व्‍हेंटिलेटरवर ठेवण्‍यात आले.

हेही वाचा : राज्यात थंडी कमी होण्याचा अंदाज

नगर रस्त्यावरील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये या बाळाला हलविण्यात आले. या बाळावर सुरूवातीला सर्फक्टंटचा वापर करत जन्‍मापासून सलग २० तास त्याचा जीव वाचवण्‍याचा प्रयत्‍न करीत असताना फुफ्फुसामध्‍ये रक्‍तस्राव होऊन गंभीर स्थिती निर्माण झाली. त्यामुळे बाळाला रि-इंट्युबेशन आणि उच्‍च वारंवारतेमध्‍ये व्‍हेंटिलेशन द्यावे लागले. बाळाची तब्येत सुधारण्यासाठी संपूर्ण उपचारादरम्यान त्याच्यासाठी बारकाईने केलेले पोषण व्‍यवस्‍थापन अतिशय महत्वपूर्ण ठरले. अखेर बाळाला त्याच्या वयाच्या ६७व्‍या दिवशी व्‍हेंटिलेटर सपोर्टवरून काढण्‍यात आले आणि तेव्‍हापासून बाळाला दूध पाजले जात आहे. यामुळे बाळाचे वजन वाढले असून वयाच्‍या ९२व्‍या दिवशी बाळाचे वजन अडीच किलोवर पोहोचले. त्यानंतर त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

हेही वाचा : येत्या काळात नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार… एआयसीटीईचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांचे मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“प्रसूतीकाळ पूर्ण होण्‍यापूर्वी व २६ आठवड्यांपेक्षा कमी वय असलेल्‍या बाळाचे वाचणे दुर्मीळ गोष्ट आहे. तज्ञांच्या देखरेखेखाली घेण्यात आलेली रुग्णाची काळजी आणि वेळेवर केलेल्या हस्‍तक्षेपाचे महत्त्व दिसून येते.” – डॉ. प्रदीप सूर्यवंशी, संचालक, बालरोगविभाग, सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (नगर रस्ता)