पुणे : शहरातील रस्त्यांवर चार हजार बेवारस वाहने असून, येत्या १५ दिवसांमध्ये येथील सर्व बेवारस वाहने हटवली जाणार आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियाना’च्या माध्यमातून गणेश पेठेतील दूधभट्टी चौकामध्ये बेवारस वाहने हटविण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., झोन एकचे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह कसबा मतदारसंघातील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

शहरात जवळपास चार हजारांवर धूळ खात पडलेली बेवारस वाहने आहेत. यामुळे पार्किंगची समस्या वाढत असून, आरोग्यावरही परिणाम होतो. यातील काही वाहने चोरीची असतात, तर काहींचे मालक सापडत नाहीत. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार या प्रकारच्या वाहनांच्या मालकांना प्रथम नोटीस दिली जाईल. मात्र, कोणी मालक नसल्यास वाहतूक पोलीस गाड्या जप्त करतील आणि पुढे कायदेशीर प्रक्रिया करून लिलाव केला जाईल, असे मनोज पाटील यांनी सांगितले.

कसबा मतदारसंघात पहिल्या दिवशी १३९ वाहने उचलण्यात आली आहेत. महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यावर धूळ खात पडलेली ४५ वाहने गेल्या महिन्यात उचलण्यात आली आहेत. महापालिका आणि पोलीस यांच्यामध्ये समन्वय साधून ही कारवाई केली जात आहे. दोन्ही विभागांकडून रस्त्यावर अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. वाहने जप्त केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यासाठी काही महिने लागत असल्याने ती ठेवण्यासाठी बाणेर येथे महापालिकेची जागा असून, कोंढव्यात नवीन जागा उपलब्ध करून देण्यात येईल. खराब झालेल्या महापालिकेच्या वाहनांचादेखील लवकरच लिलाव केला जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेमंत रासने म्हणाले, ‘रस्त्यावर कचरा तसेच बेवारस साहित्य असू नये, हा प्रयत्न आहे. त्यामुळे अशी वाहने उचलण्यासाठी पुणे पोलीस, वाहतूक विभाग आणि महापालिकेच्या संयुक्तिक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. कसबा अनधिकृत फ्लेक्समुक्त करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत.’