पुणे : समाजाच्या वेगवेगवेगळ्या स्तरांत वावरताना ‘पुलं’च्या व्यक्ती आणि वल्लीमधील पात्रे सहजपणे दिसतात. त्यांनी केलेला निखळ विनोद आणि त्यांचे साहित्य माणसांच्या अंतरंगात डोकावण्याची नवी दृष्टी देते. ‘पुलं’नी समृद्ध पिढी घडवणारे लेखन केले,’ असे मत ज्येष्ठ सामाजित कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी बुधवारी व्यक्त केले.
‘ग्लोबल पुलोत्सवा’त प्रभुणे यांच्या हस्ते ब्रेल लिपीच्या माध्यमातून अंधांसाठी चित्रकलेचे प्रयोग करणारे चित्रकार चिंतामणी हसबनीस यांना ‘पुलोत्सव कृतज्ञता सन्माना’ने गौरविण्यात आले. त्यावेळी प्रभुणे बोलत होते. कोहिनूर समूहाचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, ‘लोकमान्य’चे सुशील जाधव, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात डॉ. मंदार परांजपे यांनी हसबनीस यांच्याशी संवाद साधला.
प्रभुणे म्हणाले, ‘विकासाच्या प्रवाहात जलदगतीने धावणारा समाज आता अंध झाला आहे. कला लोप पावते होते आहे. सध्याच्या सामाजिक-राजकीय वातावरणामुळे समाजाला संस्कृती आणि कलेच्या समृद्ध वारशाचा विसर पडतो आहे. हसबनीस यांनी त्यांच्या चित्रकलेतून प्राचीन मानवाच्या सांस्कृतिक प्रवासालाच उलगडले आहे. सगळीकडे अंधार दाटला असताना माणसाने गुहेत चित्र निर्माण केली. आता समाज अंध होत असताना हसबनीस यांच्यासारख्या कलाकाराची गरज निर्माण झाली आहे.’
‘‘पुलं’नी विनोदाच्या माध्यमातून समाजातील व्यक्ती, चित्रे टिपली. त्यांचे साहित्य निखळपणे भाष्य करणारे आहे. त्यांच्यासारख्या महान कलाकाराच्या नावाने होत असलेल्या या महोत्सवात पुरस्कार मिळणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. ‘पुलोत्सवा’त मिळालेल्या पुरस्काराने मेहनतीचे चीज झाले,’ अशी भावना हसबनीस यांनी व्यक्त केली. वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.