पुणे : आरोग्य कर्मचाऱ्यांवर कीटकजन्य आजारांच्या सर्वेक्षण आणि नियंत्रणाची जबाबदारी असते. या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे नेमकी कोणत्या रोगाची साथ आहे, हे आरोग्य विभागाला वेळीच समजण्यास मदत होते. मात्र, या सर्वेक्षणाच्या पद्धती जुन्या असून त्यात काळानुरूप बदल झालेले नाहीत. आता सर्वेक्षणाच्या नवीन पद्धतींचे प्रशिक्षण आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले जात आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचे सर्वेक्षण अधिक शास्त्रीय पद्धतीने आणि अचूक होण्यास मदत होत आहे.

पुणे नॉलेज क्लस्टरच्या (पीकेसी) वतीने यासाठी सक्षम कार्यशाळा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कीटकजन्य आजारांच्या सर्वेक्षणाचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात प्रामुख्याने रोगाची साथ ओळखणे, त्याचे नियंत्रण आणि समाजात जागरूकता निर्माण करणे यांचा समावेश आहे. या कार्यशाळेत आरोग्य कर्मचाऱ्यांना रोगाची साथ ओळखणे, रक्ताचे नमुने गोळा करणे, औषधे वितरित करणे, डासांची उत्पत्ती ठिकाणे शोधणे, साथरोग नियंत्रण उपाययोजनांवर लक्ष ठेवणे आदी बाबी शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकविल्या जात आहेत.

हेही वाचा : पिंपरी- चिंचवडकरांना आणखी किती दिवस दिवसाआड पाणी? प्रशासनाची मोठी माहिती

पीकेसीच्या वतीने याआधी पुणे महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले होते. पुणे शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव मागील काही वर्षात सातत्याने वाढत आहे. त्यामुळे डेंग्यूचा प्रसार रोखणे ही बाब केंद्रस्थानी ठेवून आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेतील (एनआयव्ही) शास्त्रज्ञांसह राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप, राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्र आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. या प्रशिक्षणात यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल, प्रयास आणि भारतीय हवामान विभागातील तज्ज्ञही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत.

हेही वाचा : ‘महाराष्ट्रात अजित पवार पर्व सुरू’, शरद पवारांवर सुनील तटकरेंचा पलटवार

जिल्ह्यात ११ तालुक्यांत प्रशिक्षण पूर्ण

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांच्यासोबत पीकेसीने जिह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला. त्यात पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आतापर्यंत हवेली, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, इंदापूर, बारामती, आंबेगाव, जुन्नर, खेड आणि पुरंदर या ११ तालुक्यांतील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आता दौंड आणि शिरूर तालुक्यांतील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Story img Loader