पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिकांशी शुक्रवारी चर्चा केली. त्यात आयटी पार्कमध्ये गावठाणांच्या हद्दीत रस्त्यांची रुंदी कमी ठेवण्याची स्थानिक ग्रामपंचाय़तींची मागणी त्यांनी मान्य केली. यामुळे आयटी पार्कमध्ये प्रस्तावित रस्ते रुंदीकरणावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी चाकण औद्योगिक क्षेत्राची शुक्रवारी पहाटे पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मुख्यालयात आढावा बैठक घेतली. आयटी पार्कमधील हिंजवडी आणि ग्रामपंचायतींनी प्रस्तावित रस्ते रुंदी कमी ठेवावी, असा ठराव ग्रामसभेत मंजूर केला होता. या पार्श्वभूमीवर या गावांतील ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मागण्या मांडल्या. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन गावठाणांच्या हद्दीत रस्त्यांची रुंदी कमी ठेवण्याचे आश्वासन दिले. याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी पीएमआरडीएला दिले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, चाकण औद्योगिक क्षेत्र परिसर आणि हिंजवडी आयटी पार्कमध्ये खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे व्यवसायिक, कामगार, वाहनधारकांना अनेक अडचणी येतात. या भागात अतिक्रमणधारकांची संख्या अधिक असल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम राबवत तातडीने अरुंद असलेले रस्ते रुंद करण्यासाठी पावणे उचलणे अपेक्षित आहे. अतिक्रमण काढल्यानंतर त्या ठिकाणी रस्ते विकसित झाले नाही तर पुन्हा अतिक्रमण वाढते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयातून अतिक्रमण काढल्यानंतर तातडीने रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा.

चाकण परिसरात ट्रक टर्मिनल

चाकणसह परिसरात येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अशा वाहनांवर ठराविक वेळेची बंधने घालत एमआयडीसी भागात ट्रक टर्मिनल सुरू करण्यावर भर द्यावा. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागासह पोलीस यंत्रणेने संयुक्तपणे नियोजन करणे अपेक्षित आहे. यासह कचऱ्याची समस्या निकाली काढत या भागातील अतिक्रमणे तातडीने काढावी. रस्ते विकसित करताना जर कोणी चुकीची भूमिका घेत असेल तर त्यांच्यावर नियमानुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

राजीव गांधी इन्फोटेक पार्क परिसरात गावठाणाच्या हद्दीत रस्त्यांची रुंदी कमी ठेवावी, अशी स्थानिक ग्रामपंचायतींची मागणी होती. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. या अनुषंगाने विकास आराखड्यात सुधारणा केल्या जाणार आहेत. आयटी पार्कमध्ये गावठाणे वगळता इतर ठिकाणी मात्र रस्त्यांची रूंदी विकास आराखड्याप्रमाणे राहील. – डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए

आयटी पार्क परिसरातील हिंजवडी आणि माण ग्रामपंचायतींनी गावठाणांच्या हद्दीत रस्त्यांची रुंदी कमी ठेवण्याची मागणी केली होती. आमची ही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केली आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. – गणेश जांभूळकर, सरपंच, हिंजवडी