पुणे : उपलब्ध ज्ञानात नवी भर घालणे, मानवाचे जीवन अधिक सुकर करणारे नवे तंत्रज्ञान विकसित करणे हे तंत्रज्ञानाची नवी दिशा ठरवताना प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवे. पण या दोन्ही गोष्टी साध्य न करणाऱ्या नावापुरत्या संशोधनाने काहीही साध्य होत नाही. भारताचे संशोधन या दिशेने चालले आहे. याबाबतीत बदल होणे आवश्यक आहे, असे परखड मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी मांडले. संशोधनाधिष्ठित उद्योगच आजच्या काळात अर्थकारणाचे प्रमुख स्तंभ होत आहेत. मात्र, या क्षेत्रातही भारताचे स्थान नगण्य असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे प्रा. राम ताकवले स्मृती व्याख्यानावेळी डॉ. काकोडकर बोलत होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत, व्यवस्थापकीय संचालक वसुधा कामत, वरिष्ठ महाव्यवस्थापक उदय पंचपोर, डॉ. रेवती नामजोशी या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रा. राम ताकवले यांच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. मुक्त विद्यापीठासह प्रा. राम ताकवले एमकेसीएल संशोधन शिष्यवृत्ती सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली.

हेही वाचा : तंत्रशिक्षण संस्थांतील अध्यापनात आता स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर… काय आहे महत्त्वाचा निर्णय?

काकोडकर म्हणाले, की विकसित भारताचे स्वप्न पाहत असताना शहर आणि ग्रामीण अशी दरी निर्माण झाली आहे. जागतिक स्पर्धेत जाताना ही दरी बुजवली पाहिजे. अंगणवाड्यांमध्ये बालविकासावर भर देण्याची गरज आहे. बालविकासाचा कालखंड पुढील काळातील सक्षमतेशी निगडित आहे. त्यासाठी घर, अंगणवाडी, सामाजिक परिसर यात समन्वय हवा. नव्या धोरणात बालविकासावर खूप भर असला, तरी त्याची अंमलबजावणी कशी होणार हा कळीचा प्रश्न आहे. बालविकासाबाबत आपल्याकडे संशोधनाची गरज आहे. उपजीविकेसाठी कौशल्य शिक्षण गरजेचे आहे. कौशल्य शिक्षणाची दृष्टी आणखी व्यापक व्हायला हवी. आजचे शिक्षण त्या अनुरूप आहे का हे तपासायला हवे. तसेच कौशल्य शिक्षण नियमित शिक्षणाचाच भाग असले पाहिजे.

हेही वाचा : पिंपरी: मावळमध्ये उमेदवारांची दमछाक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्यावसायिक शिक्षणाच्या मुबलक संधी असल्या, तरी चांगल्या दर्जाचे शिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या तोकडी आहे. त्यामुळे प्रवेशासाठी जीवघेणी स्पर्धा निर्माण होऊन कोचिंग क्लास नावाची विकृती शिक्षण क्षेत्रात आली आहे. अनेक व्यावसायिक महाविद्यालयांची निर्मिती शिक्षणासाठी कमी आणि व्यवसायासाठी जास्त झाली आहे. शिक्षण आणि संशोधन परस्परपूरक आहे हे समजून घेतले पाहिजे. संशोधकवृत्ती जोपासल्यास शिक्षणही चांगले होऊ शकते. संशोधनाचे विषय डोळसपणे पाहिले पाहिजेत, असेही डॉ. काकोडकर म्हणाले.