पुणे : जबड्याच्या गुंतागुंतीच्या समस्येने ग्रस्त असलेला रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेला. तिथे त्याला चार ते पाच दिवस ठेवून शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा खर्च सांगण्यात आला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अखेर त्याने रेल्वेच्या विभागीय रुग्णालयात धाव घेतली. तेथील डॉक्टरांनी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे या रुग्णावर यशस्वी उपचार केले. हा रुग्ण मँडिब्युलर सबकाँडाइलने ग्रस्त होता. त्याला पाच दिवसांपूर्वी शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णाला शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नसल्याने शस्त्रक्रिया न करताच त्याला रेल्वे रुग्णालयात पाठवण्यात आले. रेल्वे रुग्णालयातील डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शल्यचिकित्सक आणि भूलतज्ज्ञ यांनी रुग्णावर ओपन रिडक्शन आणि इंटरनल फिक्सेशन (ओआरआयएफ) शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया ५ तास ४५ मिनिटे चालली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, त्याची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे. ही शस्त्रक्रिया डॉ. प्रणय कुडे, डॉ. अंकित साह, डॉ. मिलिंद एनडी, डॉ. अंकिता, डॉ. नवीन यांच्या पथकाने केली, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी दिली.
हेही वाचा : रेल्वेचे ‘पहिले पाढे पंचावन्न’! वर्षानुवर्षे त्याच चर्चेचे गुऱ्हाळ अन् कार्यवाही शून्य
सहा लाखांचा खर्च केवळ ३० हजारांवर
खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी सुमारे ६ लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला होता. हा खर्च रुग्णाला परवडणारा नव्हता. अखेर पुण्याच्या रेल्वे रुग्णालयात ही शस्त्रक्रिया केवळ ३० हजार रुपयांत इम्प्लांट आणि उपचाराच्या शुल्कासह करण्यात आली. त्यामुळे रुग्णाला माफक दरात चांगले उपचार मिळू शकले.