पुणे : विद्यार्थ्यांना प्रश्न पडले पाहिजेत, तसेच त्यांनी प्रश्न विचारायला शिकले पाहिजे, असे मत माजी सनदी अधिकारी लीना मेहेंदळे यांनी व्यक्त केले. सुश्री फाउंडेशनतर्फे आयोजित डाॅ. ल. का. मोहरीर स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अभिजात माध्यमिक शाळेतील आठवी ते दहावीच्या संस्कृतमध्ये उत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना डाॅ. मोहरीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच संस्कृत शिक्षिका मिनाक्षी यादव यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला.

यंदा या पुरस्कार वितरणाचे पाचवे वर्ष होते. या वेळी फाउंडेशनचे विश्वस्त वैभव रांजणगावकर, जान्हवी ओक यांच्यासह चित्रा मोहरीर, शाळेच्या संचालिका अमला भागवत, मुख्याध्यापिका पूर्वा म्हाळगी, शैक्षणिक सल्लागार सुनील वाटवे, कमल कोठारी आदी उपस्थित होते.

संस्कृत आणि गणित या विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात पण त्यासाठी परिश्रमांची गरज असते, हे सांगत असतानाच विद्यार्थी आणि त्यांच्या मनात निर्माण होणारे प्रश्न हेदेखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे श्रीमती मेहेंदळे म्हणाल्या. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या संस्कृत हस्तलिखिताचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांचे स्वागत आरती दिवटे, प्रास्ताविक माही कदम आणि सूत्रसंचालन दिव्या आणि चैत्राली शिंदे या विद्यार्थिनींनी संस्कृतमधून केले.