पुणे : मेट्रो स्थानकांच्या उभारणीतील त्रुटी काही ज्येष्ठ अभियंत्यांनी समोर आणल्या होत्या. यामुळे मेट्रोच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावरून शुक्रवारी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यावेळी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी काही त्रुटी असल्याची कबुली देत दुरुस्ती सुरू असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दानवे यांनी महामेट्रोच्या कार्यालयाला भेट देऊन मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेतला. या वेळी महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे उपस्थित होते. या शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्यासह इतर नेतेही बैठकीला उपस्थित होते. या वेळी दानवे यांनी पुण्यातील काही ज्येष्ठ अभियंत्यांनी मेट्रो स्थानकांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांचा उल्लेख केला. मेट्रोची सुरक्षितता ही जनतेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असून, त्यात त्रुटी आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : “ससूनचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांना अटक करा”, आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

यावर महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी कामात काही त्रुटी असल्याची कबुली दिली. या त्रुटी सामान्य असून, त्या दूर करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मेट्रोच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करणारे सर्व तज्ज्ञ व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यावर महामेट्रोने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली. तांत्रिक कारणामुळे मेट्रो बंद पडत असल्याचाही मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. या घटना आठवड्यातून एखाद्या वेळी घडत असून, त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : पुणे: चंद्रकांत पाटील यांच्या आता प्रभागनिहाय बैठका

स्थानकांच्या नावांचीही चर्चा

मेट्रोच्या स्थानकांना महापुरुषांची नावे देण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी केली. याचबरोबर शिवाजीनगर स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजीनगर आणि रूबी हॉल स्थानकाचे नाव माता रमाबाई आंबेडकर स्थानक करावे, अशी सूचना त्यांनी केली. यावर महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे सांगितले.

हेही वाचा : पुणे जिल्ह्यातील मतदार संख्या ८० लाख ७३ हजार

“मेट्रो स्थानकांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना महामेट्रोने थातूरमातूर उत्तरे दिली आहेत. त्यांनी आमच्या मुख्य प्रश्नांना बगल दिली आहे. आम्ही अतिशय गंभीर त्रुटी मांडल्या होत्य़ा. त्यांनी आता केलेले दुरुस्तीचे काम अतिशय वरवरचे आहे. त्यांच्याकडून त्रुटी लपविण्य़ाचा प्रयत्न सुरू आहे”, असे हैदराबाद मेट्रोचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ यांनी म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune mahametro officials agree about errors in construction of pune metro stations pune print news stj 05 css
First published on: 28-10-2023 at 14:33 IST