पुणे : महिलांमधील उद्योजकतेला चालना देण्यासह उद्योगाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर योग्य मार्गदर्शनासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरने पुढाकार घेऊन खास महिलांसाठी उत्कृष्टता केंद्राची (सेंटर ऑफ एक्सलन्स) स्थापना केली आहे. टिळक रस्ता येथील एमसीसीआयएच्या इमारतीत उभारलेल्या या केंद्रात महिला उद्योजकांना कामासाठी जागा उपलब्ध होणार असून, वीस प्रकारच्या सेवाही मिळणार आहेत.

उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन बुधवारी झाले. एमसीसीआयएचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक प्रशांत गिरबने, कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष आनंद देशपांडे, डॉ. विद्या येरवडेकर, संचालक ऋतुजा जगताप, आनंद चोरडिया, माजी राजदूत गौतम बंबावले, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे (डिक्की) संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे, एअर मार्शल (नि.) भूषण गोखले या वेळी उपस्थित होते. उत्कृष्टता केंद्रामध्ये २५ महिला उद्योजकांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याशिवाय व्यवसायासाठी सरकारी योजना, विविध प्रकारची प्रमाणपत्रे, तांत्रिक प्रक्रियांची पूर्तता, विपणन अशा २० प्रकारच्या सेवाही पुरवल्या जाणार आहेत.

हेही वाचा : आरोग्यासाठी पाठवा पत्रे! जन आरोग्य अभियानाकडून मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना मोहीम

महिला उद्योजकांची संख्या वाढायला हवी. त्यासाठी व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून मार्गदर्शन करणाऱ्या केंद्राची आवश्यकता होती. अशा प्रकारचे राज्यातील पहिले केंद्र आहे. महिला उद्योजकांना अत्यंत नाममात्र शुल्कात जागा आणि सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रियेतून सहा महिन्यांपर्यंत या केंद्रात जागा मिळणार असल्याची माहिती गिरबने यांनी दिली. महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह उद्योजक महिलांना सर्वांगीण मार्गदर्शन केंद्राद्वारे दिले जाणार आहे. त्यामुळे महिला नवउद्यमींची संख्या येत्या काळात वाढेल, असे करंदीकर यांनी सांगितले.

हेही वाचा : पिंपरी : विकासकामांसाठी कर्ज काढणारी पिंपरी महापालिका मेट्रो मार्गिकेखाली लावणार कोट्यवधींचे दिवे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरगुती व्यवसायापासून अभियांत्रिकी क्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रांत महिला उद्योजक कार्यरत आहेत. मात्र व्यवसायासाठी जागा, मार्गदर्शन, आर्थिक उपलब्धता अशा विविध समस्या असतात. एमसीसीआयएने पुढाकार घेऊन उभारलेल्या या केंद्राच्या माध्यमातून महिला उद्योजकांना नक्कीच दिशा मिळेल, अशी भावना या केंद्रात सहभागी झालेल्या उद्योजक उज्ज्वला गोसावी यांनी सांगितले. उत्कृष्टता केंद्रात सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यासाठी sarikad@mcciapune.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.