पुणे : संगीत साधनेमध्ये बंदिशींच्या माध्यमातून निर्गुण निराकार रागांची सगुण साकार मूर्ती तयार होते, असे मत ज्येष्ठ संगीत गुरू डॉ. माधुरी डोंगरे यांनी व्यक्त केले. गांधर्व महाविद्यालयाच्या ९३ व्या वर्धापन दिनानिमित्त वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आयुक्त दिनेश भोयर यांच्या हस्ते डाॅ. माधुरी डोंगरे यांचा पं. विष्णू दिगंबर पलुस्कर स्मृती गुरू गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या.
गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पं. प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणिता मराठे या वेळी उपस्थिती होत्या. डॉ. डोंगरे यांच्याशी मंजिरी जोशी यांनी संवाद साधला. प्रमोद मराठे यांनी महाविद्यालयाला दोन लाख रुपयांची देणगी जाहीर केली. तसेच गुरुकुलातील विद्यार्थी मयूरेश गाडगीळ, सविता हेगडे, विजय तुळसकर, आर्यन देशपांडे यांना संवादिनी भेट देण्यात आली.
डाॅ. डोंगरे म्हणाल्या, ‘सहज मिळालेली संगीत कला सुलभ नाही. त्यासाठी रियाज करणे आवश्यक आहे. मी स्वत:ला गुरू नव्हे, तर शिक्षकाच्या भूमिकेत पाहते. शिक्षकाने विद्यार्थ्याला शास्त्रीय संगीताची गोडी लावणे हे अवघड काम आहे. गुरू म्हणजे तळमळ, त्याला विद्यार्थ्याच्या प्रगतीची तळमळ असणे आवश्यक आहे. फ्युजनच्या क्षेत्रात सर्जनशीलतेने काम करताना अभिजाततेचा गाभा सुटता कामा नये.’
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. डोंगरे यांनी रचलेल्या बंदिशी त्यांच्या शिष्या पौरवी साठे, रमा कुलकर्णी, गायत्री गोखले, कस्तुरी जोशी यांनी सादर केल्या. त्यांना पुष्कर महाजन (तबला) आणि मीनल नांदेडकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली.