पुणे : राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांच्या मूल्यांकन पद्धतीनेमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता उच्च शिक्षण संस्थांना मूल्यांकनाची श्रेणी पद्धत हद्दपार करण्यात करून बायनरी पद्धत, शिक्षण संस्थांनी माहिती सादर करण्यासाठी ‘वन नेशन वन डेटा प्लॅटफॉर्म’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅकने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अनुषंगाने नॅक, एनबीए., एनआयआरएफ अशा मूल्यांकन संस्थांच्या प्रक्रियेत बदल प्रस्तावित होते. त्यासासाठी नियुक्त केलेल्या डॉ. राधाकृष्णन समितीचा अहवाल केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी १६ जानेवारी रोजी स्वीकारला. २७ जानेवारीला नॅकच्या बैठकीत ही प्रक्रिया अंमलबजावणीच्या दृष्टीने चर्चा करून नवी पद्धत पुढील चार महिन्यांत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे ‘बूथ चलो अभियान’
नॅक मूल्यांकनासाठी महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्थांमध्ये उच्च श्रेणी प्राप्त करण्यासाठी चढाओढ असायची. मात्र, आता श्रेणी पद्धत हद्दपार करण्यात आली आहे. आता नॅक मूल्यांकनात बायनरी पद्धतीचा वापर करण्यात येईल. त्यात मूल्यांकन झाले, मूल्यांकनाच्या प्रतीक्षेत, मूल्यांकन झालेले नाही असे तीन स्तर असतील. ही पद्धत जगातील आघाडीच्या देशांमध्ये वापरली जाते. या पद्धतीमुळे अधिकाधिक उच्च शिक्षण संस्थांनी मूल्यांकनाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. मूल्यांकन प्रक्रियेचे सुलभीकरण तसेच मॅच्युरिटी बेस्ड ग्रेडिंग पद्धतीही समाविष्ट करण्यात आली आहे. मूल्यांकनामध्ये एक ते पाच स्तर तयार करून उच्च शिक्षण संस्थांना त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. स्तर चार हा राष्ट्रीय उत्कृष्टतेचा असेल, तर स्तर पाच हा जागतिक उत्कृष्टतेचा असेल. ही पद्धत डिसेंबर २०२४पासून लागू करण्यात येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले. उच्च शिक्षण संस्थांना मूल्यांकनासाठी विदा सादर करणे सोपे होण्यासाठी वन नेशन वन डेटा प्लॅटफॉर्म लागू करण्यात येणार आहे. महाविद्यालयांनी या संकेतस्थळावर त्यांचा मूल्यांकनसाठीचा विदा उपलब्ध करून द्यायचा आहे. त्यामुळे मूल्यांकनासाठी उच्च शिक्षण संस्थांना भेटी देण्याचे प्रमाण कमी होईल, असे नमूद करण्यात आले आहे.