पुणे : राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) वीज देयके, थकबाकी आणि वीजजोडण्यांशी संबंंधित १,०५७ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, २ कोटी १८ लाखांची थकबाकी वसुली करण्यात आल्याची माहिती ‘महावितरण’कडून देण्यात आली.
पुणे विभागातील थकबाकीमुळे वीज पुरवठा बंद करण्यात आलेली ५१ हजार ३१७ प्रकरणे पुण्यात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यातील १ हजार ०५३ प्रकरणे निकाली निघाली. त्यातून २ कोटी १४ लाख ८९ हजार ३०८ रुपयांची थकबाकी वसुल करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी सांगितले.
पुणे ग्रामीणमधील १० ग्राहकांकडून १ कोटी ३ लाख ४१ हजारांचा, तर रास्तापेठ विभागातील ९६ लाख ९७ हजार ८१८ आणि गणेशखिंड विभागातून १७ लाख ८४ हजार ९३० रुपयांची थकबाकी वसुल करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महावितरणकडून वीजचोरीची ८३ प्रकरणे लोकअदालतीपुढे ठेवण्यात आली होती. त्यातील केवळ ४ प्रकरणांने निकाली निघाली असून, ४ लाख ८ हजार ४४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्रभारी विधी सल्लाकार दिनकर तिडके, कनिष्ठ विधी अधिकारी नितल हासे, अंजली चौगुले आणि इम्रान शेख यांनी या लोकअदालतीचे कामकाज पाहिले.
दरम्यान, थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणकडून विशेष वसुली मोहिमा राबवण्यात येतात. मात्र, त्यातूनही ज्या प्रकरणांमध्ये वसुली होत नाही, अशी प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवली जात असल्याची माहिती महाविरणकडून देण्यात आली.