पुणे : उंट, घोड्यावरून रपेट, बँडच्या मधुर सुरावटींसह चाॅकलेट आणि फुगे देऊन, नृत्याचे धडे गिरवीत आणि आईस्क्रीम खाण्याचा मनसोक्त आनंद लुटत मामाच्या गावात भाचे मंडळींचे जंगी स्वागत करण्यात आले. वंचित आणि विशेष चिमुकल्यांना मामाच्या गावाची मजा अनुभवता यावी, यासाठी सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित मामाच्या गावची सफर या आगळ्यावेगळ्या उपक्रमात भाचेमंडळी तीन दिवसांसाठी आली आहेत.

भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ, आमदार हेमंत रासने, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, अभिनेता तेजस बर्वे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, डॉ. मिलिंद भोई, ॲड. हेमंत झंजाड, पराग शिंदे, अमर लांडे, सचिन सासणे, विक्रांत मोहिते, रोहन जाधव उपस्थित होते. माहेर, बचपन, वर्ल्ड फोरम, संतुलन पाषाण, संस्कार या संस्थांतील १८५ मुले-मुली सहभागी झाली आहेत. उपक्रमाचे यंदा २६ वे वर्ष आहे. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची माहिती दृक्-श्राव्य माध्यमातून देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेवा मित्र मंडळ चौकात भाचे मंडळींचे स्वागत करण्यात आले. हिंदी-मराठी गीतांच्या तालावर चिमुकले मनसोक्त नाचले. पुढील दोन दिवस या मुलांसाठी विविध स्पर्धा, सहली, आर्केस्ट्रा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (४ मे) दृष्टिहीन जोडप्यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. साखरपुडा, हळदी समारंभ आणि नवरदेवाची वरात अशा धार्मिक विधीनंतर सायंकाळी सहा वाजता विवाह सोहळा होणार आहे.