पुणे : सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याची पत्नी स्वाती हिला समाज माध्यमातून धमकी देणारा आरोपी मार्शल लीलाकर याला येरवड्यातून अटक करण्यात आली. मार्शलला सायबर पोलिसांनी अटक केल्यानंतर तो ससून रुग्णालयातून पसार झाला होता. मोहोळच्या पत्नीला धमकी दिल्याप्रकरणी मार्शलला अटक करण्यात आली होती. सायबर पोलीस ठाण्याच्या ताब्यात असलेल्या मार्शलने अकरा फेब्रुवारी रोजी छातीत दुखत असल्याची बतावणी केली. त्यानंतर त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा : करोना अँटीजेन किट गैरव्यवहार प्रकरण : डाॅ. आशिष भारती यांना अटकेपासून दिलासा
ससून रुग्णालयातून तो पसार झाला. या घटनेची गंभीर दखल घेऊन सायबर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. मार्शलला पकडण्यासाठी पोलिसांचे पथके नेरळ आणि कर्जतला रवाना झाली होती. मार्शल येरवडा भागात मावशीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला पकडण्यात आले.