पुणे : मुदतपूर्व प्रसूतीनंतर केवळ सहाशे ग्रॅम वजनाच्या बाळाचा जन्म झाला. सहाव्या महिन्यात जन्म झालेला असल्याने त्याच्या फुफ्फुस आणि हृदयाची वाढ पूर्णपणे झालेली नव्हती. त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक होती. अशा सर्व प्रतिकूल स्थितीवर मात करीत चिमुकल्याने रुग्णालयात शंभर दिवस जगण्याचा संघर्ष केला. अखेर त्याला सुखरूपपणे रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

एका महिलेला गरोदरपणातील गुंतागुंतीमुळे त्रास होत होता. तिला ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेचा रक्तदाब वाढल्याने तातडीने तिच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे २३-२४ व्या आठवड्यात जन्मलेले बाळ केवळ सहाशे ग्रॅम वजनाचे होते. त्याच्या रडण्याचा आवाजही फारसा येत नसल्याने त्याला श्वसनास त्रास होत असल्याचे डॉक्टरांनी ओळखले. त्यामुळे रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात तातडीने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

हेही वाचा : पुण्यात दररोज एक जण गमावतोय जीव! शहरातील रस्त्यांवर रोज किती अपघात?

बाळाच्या एक्स-रे तपासणीत त्याचे फुफ्फुस पूर्णपणे विकसित झाले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्याला नलिकेद्वारे द्रवपदार्थ, प्रतिजैविके आणि पोषणआहार देण्यात आला. या बाळावर शंभर दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. बाळाने उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे अखेर बरे होऊन हे बाळ रुग्णालयातून त्याच्या घरी गेले.

हेही वाचा : आपत्कालीन वैद्यकीय कक्षामुळे प्रवाशांना जीवदान! पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातच उपचार

बाळाच्या प्रकृतीसमोर अनेक आव्हाने होती. त्याला सुरुवातीला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले आणि नंतर कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला. उपचारानंतर बाळाची प्रकृती सुधारत गेली आणि त्याचे वजन दीड किलोपर्यंत वाढले.

डॉ. शिवहर सोनावणे, ज्युपिटर हॉस्पिटल