पुणे : राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून रेडीरेकनरमध्ये दरवाढ प्रस्तावित केली आहे. दरवर्षी १ एप्रिलपासून रेडीरेकरनचे नवीन दर जाहीर केले जातात. गेल्या वर्षी कोणतीही दरवाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने रेडीरेकनर दर ‘जैसे थे’ ठेवल्यास हा निर्णय नागरिकांवर प्रभाव टाकणारा ठरेल आणि त्यावर आचारसंहितेचा भंगचा शिक्का बसण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळांच्या बैठकीतही रेडीरेकनरच्या दराबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. १ एप्रिलपासून रेडीरेकनरमध्ये बदल अपेक्षित असल्याने चालू आर्थिक वर्षातील रेडीरेकनर दरांचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना करावे, अशा सूचना राज्याच्या नाेंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने राज्यातील मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवाढीबाबत शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : आकाशवाणी पुणे केंद्राचे सायंकाळचे प्रसारण ७ एप्रिलपासून पूर्ववत, पुणेकर श्रोत्यांच्या लढ्याला यश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘राज्यातील सर्व सह जिल्हा निबंधक वर्ग एक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी यांना सुचित करण्यात येते, की १ एप्रिलपासून वार्षिक मुल्यदर तक्त्यामध्ये दरवर्षी बदल होत असतात. यंदाही १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात वार्षिक मुल्य दर तक्त्यामध्ये बदल अपेक्षित आहेत. तरी जनतेने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मुल्यदराचा लाभ घेण्याचे आवाहन जनतेस आपआपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकारी यांच्या मार्फत जनतेस माहिती होईल, अशा रितीने प्रसिद्धी द्यावयाची आहे.’ असे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून राज्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे.